ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या वातानुकूलित पाच बसगाडय़ा ठाणे-दादर मार्गावर मोठय़ा धूमधडाक्यात सुरू करण्यात आल्या. मात्र, या मार्गावर फारसे प्रवासी मिळत नसल्याने परिवहनला आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. यामुळे परिवहन प्रशासनाने ठाणे-दादर या पाच मार्गावरील बससेवा सोमवारपासून बंद केली आहे. या मार्गावरील पाच बसगाडय़ा ठाणे-बोरिवली मार्गावर सोडण्यात येणार असल्याचे ठाणे परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी सांगितले.
ठाणे परिवहन उपक्रमांतर्गत शहरातील वेगवेगळ्या मार्गावर बसगाडय़ा धावत असून त्यापैकी अनेक बसगाडय़ा रस्त्यांमध्ये वारंवार बंद पडतात. यामुळे परिवहनच्या उपक्रमाविषयी ठाणेकर फारसे समाधानी नाहीत. असे असतानाच केंद्र शासनाच्या जेएनएनआरयूएम योजनेंतर्गत तीन महिन्यांपूर्वी १५ वातानुकूलित बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. या नव्या बसगाडय़ांमुळे परिवहन उपक्रमाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला होती. १५ पैकी पाच बसगाडय़ा ठाणे शहरातील ढोकाळी, कोलशेत, वंृदावन, धर्मवीरनगर (टिकुजिनी वाडी) आणि लोढा पॅराडाइज या मार्गावरून दादरला सोडण्यात आल्या. मात्र या बसगाडय़ांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. ठाण्यातून दादरला जाताना जेमतेम दहा ते पंधरा आणि दादरहून ठाण्यात येताना अवघे दोन ते तीन प्रवासी मिळतात. यामुळे प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी या मार्गावरील बससेवा  बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विनित जांगळे, ठाणे

’ठाणे-दादर या मार्गावर धावणाऱ्या बसगाडीला दोन किलोमीटर अंतरामागे एक लिटर पेट्रोल लागते. मात्र त्या तुलनेत उत्पन्न मिळत नव्हते.
’बेस्ट, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या (एन.एम.एम.टी.) या मार्गावर पूर्णवेळ धावणाऱ्या बसगाडय़ांची संख्या मोठी आहे.
’त्याचाही परिणाम ठाणे परिवहन सेवेच्या ठाणे ते दादर या मार्गावरील बससेवेला बसत होता.
’म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करून त्यावरील बसगाडय़ा कोपरी-बोरिवली मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.