ठाणे : ठाणे महापालिकेचा कचरा डायघर येथे आणला जात असल्याने येथील ग्रामस्थांनी आणि गृहसंकुलांतील रहिवाशांनी बैठका घेऊन लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी सुरू केली आहे. भांडार्ली येथील प्रकल्प बंद झाल्यानंतर मागील नऊ महिन्यांपासून डायघर येथे ठाणे महापालिकेने कचरा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाविरोधात विविध आंदोलने, निवेदन देऊनही निर्णय होत नसल्याने नाइलाजाने हा निर्णय घेतला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे येथील नागरिकांच्या आरोग्य, शेतीवर परिणाम होत असल्याची तक्रार येथील रहिवासी करत आहेत. दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांना लाखो रुपयांची घरे विक्रीला काढण्यास सुरूवात केली आहे.
ठाणे महापालिकेने हद्दीबाहेरील भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारला होता. हा कचरा प्रकल्प बंद केल्यानंतर ठाणे महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी डायघर येथे कचरा प्रकल्प सुरू केला आहे. सुमारे पाच एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला असून प्रकल्पालगत शीळ, डायघर, खिडकाळी, पडले, देसाई, उत्तरशीव, सांगार्ली, अभयनगर यासह काही गावे आहेत. याच परिसरात शिवमंदिर, शाळा, मैदान आहेत. गेल्याकाही वर्षांपासून येथे मोठ्याप्रमाणात उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गृहसंकुलातील रहिवाशांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरापासून जवळ परंतु नैसर्गिक सानिध्यात राहता यावे म्हणून अनेकांनी लाखो रुपये खर्च करून येथे गृह खरेदी केली. आता या गृहसंकुल आणि गावांपासून काही अंतरावर कचरा प्रकल्प उभा राहिल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. दररोज दुर्गंधीचा सामना रहिवाशांना सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गावातील रहिवाशांनी डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून या प्रकल्पा विरोध करण्यास सुरूवात केली. येथील गृहसंकुलातील नागरिकांनी या संघटनेला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा – मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
ठाणे महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. परंतु ठोस उपाययोजना होत नाही. दररोज ५० ते ६० डम्पर भरून कचरा परिसरात आणला जातो. मध्यरात्री हा कचरा जमिनीत पुरला जातो. दिवस-रात्र येथे दुर्गंधी निर्माण होत असल्याने विविध गंभीर आजार होत आहे. दुर्गंधीमुळे काहीजण त्यांची घरे विक्रीला काढत आहे. आमच्या शेतीवर देखील याचा परिणाम झाला असून शेतीमध्ये कचरा प्रकल्पातील पाणी शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थ कर आहेत. आमच्या मागण्यांकडे ठाणे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले. या संदर्भाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. येथे सुमारे एक लाखाहून अधिक रहिवाशी वास्तव्य करतात. त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट
गेल्या अनेक महिन्यांपासून डायघर प्रकल्पाविरोधात आंदोलने सुरू आहेत. महापालिका आयुक्त प्रकल्पाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत चर्चेचे आश्वासन देतात. परंतु पुढे काही होत नाही. जोपर्यंत हा प्रकल्प बंद होत नाही. तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीत बहिष्कार घातला जाईल असा निर्णय आम्ही घेतला आहे. गृहसंकुलातील रहिवाशांचा देखील आम्हाला पाठिंबा मिळत आहे. – मंगेश खुटारकर, सदस्य, डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती.