भगवान मंडलिक
कल्याण डोंबिवली पालिकेतील सुरक्षा विभागाच्या कार्यक्रमात सुरक्षा विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचे वेस्टन असलेले पुष्पगुच्छ वापरले म्हणून घनकचरा विभागाने त्यांना व्यक्तीगतरित्या ५००० रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड उपायुक्त भागवत यांनी व्यक्तीगतरित्या भरण्याऐवजी सुरक्षा विभागाच्या तिजोरीतून भरला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
सुरक्षा विभागाच्या तिजोरीतील पैसा हा कल्याण-डोंबिवली पालिकेतील लोकांनी कर रूपाने जमा केलेला पैसा आहे. त्यामुळे या पैशाचा वापर करण्याचा अधिकार उपायुक्त भागवत यांना नाही. त्यामुळे उपायुक्त भागवत यांच्याकडून व्यक्तिगत रित्या पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा आणि सुरक्षा विभागाने घनकचरा विभागाकडे भरलेली दंडाची रक्कम पुन्हा सुरक्षा विभागाच्या तिजोरीत जमा करावी, अशी मागणी कल्याण मधील माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी नगर विकास प्रधान सचिव, पालिका आयुक्त यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
उपायुक्तांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सुरक्षा विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आणलेल्या पुष्पगुच्छांना प्रतिबंध असलेले प्लास्टिकचे वेष्टण होते. या कार्यक्रमात घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे हेही उपस्थित होते. गेल्या दोन वर्षापासून कल्याण-डोंबिवली शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विविध मोहिमा, अभियान घनकचरा विभागाने राबविली आहेत. प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांवर. दुकानदारांवर कठोर कारवाई केली जात आहे. पालिका प्रशासन एकीकडे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच पालिकेच्या कार्यक्रमात एका उपायुक्तांनीच प्लास्टिक वेस्टन आसलेले पुष्पगुच्छ वापरले. यामुळे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी कार्यक्रमातच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला म्हणून उपायुक्त पल्लवी भागवत यांना व्यक्तिगतरीत्या पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. यामुळे कार्यक्रमातच खळबळ उडाली.
कल्याण डोंबिवलीत पालिकेची तीन नवीन डायलेसीस केंद्रे; रुग्णांचा ठाणे, मुंबई जाण्याचा त्रास वाचणार
एक पालिकेचा अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला दंड ठोठावू शकतो असा एक संदेश राज्यभर या कारवाईने गेला. एकीकडे नागरिकांना आपण प्लास्टिक मुक्त शहराचे संदेश द्यायचे आणि दुसरीकडे पालिका अधिकारी कार्यक्रमात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणार असतील, यामुळे चुकीचा संदेश समाजात जाईल हा विचार करून दंड ठोठावला आहे असे उपायुक्त कोकरे यांनी जाहीर केले होते.
आधी म्हणे दंड उपायुक्तांनीच भरला, आता मात्र…
हा दंड उपायुक्त भागवत यांनी व्यक्तिगतरित्या भरला असल्याचा संदेश सर्वदूर गेला. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार उपायुक्त भागवत यांनी व्यक्तिगतरीत्या पाच हजार रुपयांचा दंड भरलेला नसून तो सुरक्षा विभागाच्या तिजोरीतून भरला असल्याचे उघडकीला आले आहे. सुरक्षा विभागाने पाच हजार रुपये दंडाची भरलेली पावती संशयास्पद आहे. या पावतीवर तारीख, पालिकेचा कोणता विभाग, कोणत्या अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम जमा करून घेतली आहे याचा कोणताही बोध या पावती वरून होत नाही. या पावती प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.
उपयुक्त भागवत यांना दंड ठोठावला नंतर ती रक्कम घनकचरा विभागाकडे जमा झाली आहे. ही रक्कम कोणी भरली याविषयी आमचे काही म्हणणे नाही. फक्त दंड रक्कम जमा झाली आहे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.