ठाणे : भाजप, शिंदे गट आणि आता मनसे अशा तिन्ही पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात असून या टिकेला ठाकरे गटाचे ठाणे उप जिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी उत्तर दिले आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसे हे तिघे एकत्र अंगावर येत असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्यावर भारी पडत असल्याचा दावा करत हे नाव घेतल्याशिवाय विरोधकांना झोपच लागत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे शिंदे गटाचे समर्थन करताना या फुटीस उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवतात. मात्र, त्यांचे १३ आमदार का सोडून गेले? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत, अशी टिका त्यांनी केली आहे.
भाजपा, मनसे आणि शिंदे गट हे सगळे मिळून अंगावर आले तरी बाळासाहेबांचा वाघ उद्धव ठाकरे हे झुकत नाहीत, झुकणार नाहीत, असे सांगताना संजय घाडीगावकर यांनी राज ठाकरे यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. शिवसेनेला सोडून ४० गद्दार निघून गेले, ते सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी निघून गेले. पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांनी बळकावले. ज्या शिवसेनेने त्यांना मोठ केले, त्याच शिवसेनेच्या फुटीस ते कारणीभूत ठरले. राज ठाकरे हे शिंदे गटाचे समर्थन करताना या फुटीस उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवतात. मात्र, राज ठाकरेंना त्यांचे १३ आमदार का सोडून गेले? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत, अशी टिका त्यांनी केली आहे.
हेही वाचा – Video गोष्ट असामान्यांची: सिग्नलवरील मुलांसाठी शिक्षणाचं दार खुलं करणारी ‘सिग्नल शाळा’
हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट
गेल्या काही वर्षांत मनसेला अनेक नेते का सोडून गेले, याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, असे राज ठाकरे म्हणाले. मात्र तेच नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेले. मंत्री झाले आणि काँग्रेसला सोडून निघून गेले. स्वतःचा पक्ष स्थापन करून त्या पक्षातूनदेखील स्वतः नारायण राणे बाहेर पडले आणि भाजपामध्ये दाखल झाले. मग यालापण उद्धव साहेब जबाबदार आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. राणे यांची बाजू राज ठाकरे घेतात आणि उद्धव साहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. यातूनच यांचे राजकारण लक्षात येते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी असून महाराष्ट्रातील जनतेची साथ त्यांना आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.