ठाणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या दिशा प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पामुळे इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद, गोष्ट आणि श्रुत लेखनात विकास साधल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी भाषेतील गोष्टी वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या नऊ महिन्यात १५ हजाराहून थेट २८ हजार ९१० वर पोहोचली आहे. तर, इंग्रजी, उर्दू आणि मुलभूत संख्या ज्ञान यामध्ये दुपट्ट ते अडीच टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२७ शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करुन दिशा प्रकल्प गेले नऊ महिन्यांपासून राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दर महिन्याला ७२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली. या प्रकल्पासाठी ॲप्लिकेशन तयार केले असून त्या माध्यमातून एका विद्यार्थ्याचे आकलन क्षमता ओळखण्यासाठी तीस सेकंदाचा कालावधी लागतो. ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, अशा विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. मराठी, इंग्रजी किंवा गणित अशा प्रत्येक विषयाचे सहा स्तर ठरविले आहेत. त्यामध्ये अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद, गोष्ट आणि श्रुत लेखन असे स्तर आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे याची चाचणी दर महिन्याला घेतली जाते. एका स्तरवरुन पुढच्या स्तरावर जाण्यासाठी त्याला वैयक्तिकृत शिक्षण दिले जाते.

गेल्या नऊ महिन्यात या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर पाहिल्यास १५ हजार १९० विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दिशा अंतर्गत त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात वाढ होवून मार्च २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ९१० इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.

– इंग्रजी आणि उर्दू भाषेतही विद्यार्थ्यांची प्रगती

ग्रामीण भागातील इयत्ता १ ली आणि २ री च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी दिशा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विध्यार्थ्यांच्या अध्ययनात अमुलाग्रह बदल होवून गुणवत्तेत वाढ झाली आहे. यामध्ये इंग्रजी विषयामध्ये अडीच पट्टीने तर, उर्दू भाषेत तीपट्टीने आणि मुलभूत संख्या ज्ञान मध्ये देखील दुपट्टीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.