ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ या शहरांना शनिवारपासून मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रविवारी सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. बदलापूरमधलं बारवी धरण आपल्या जुन्या क्षमतेनुसार भरलं आहे. मध्यंतरी बारवी धरणाची पातळी चार फुटांनी वाढवण्यात आली होती. सध्याच्या घडीला बारवी धरणातला पाणीसाठा ७१.४९ मी. इतका असून उच्चतम पातळी ७२.६० मी. एवढी आहे. मात्र धरणालगतच्या गावांमध्ये होत असलेला पाऊस पाहता, जिल्हा प्रशासनाने पाण्याचा विसर्ग उल्हास नदीत करण्याची तयारी ठेवली आहे. याचसाठी धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंबरनाथ-बदलापूर, कल्याण-मुरबाड परिसरातील आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सांगाव, पाटीलपाडा, पादिरपाडा, कारंद, मोऱ्याचा पाडा, चोण, राहटोली…तसेच कल्याण तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारवी धरणातून अतिरीक्त पाण्याचा विसर्ग झाल्यास…या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिवीत आणि वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

याचसोबत कोणत्याही पर्यटकांनी किंवा नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरण्याचा किंवा पोहण्याचा प्रयत्न करु नये असेही आदेश देण्यात आले आहेत.