ठाणे जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना
ब्राझील तसेच लॅटिन अमेरिकेमध्ये पसरत चाललेल्या जीवघेण्या ‘झिका’ आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या ‘आपत्कालीन परिस्थिती’ इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनानेही या आजारावर वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी सावधगिरी घेण्यास सुरुवात केली आहे. हा आजार डासांमुळे पसरत असल्याने जिल्ह्य़ातील डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभागातर्फे गटारांमध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी बी. एस. सोनावणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत झिका आजार, त्याची लक्षणे तसेच त्याबाबत बाळगायची सावधगिरी याबाबत माहिती दिली. ‘झिका विषाणू हा फलॅव्हीव्हायरस प्रजातीचा असून एडीस डासांच्या मार्फत पसरतो. हा डास देशभरात मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याने या कार्यक्षेत्रात झिका आजाराची लागण होऊ शकते. तसेच गर्भवती महिलेस झिका आजार झाल्यास जन्माला येणाऱ्या बाळाचे डोके लहान होऊन आजाराची लागण होते,’ असे सोनवणे म्हणाले. तसेच या आजारामध्ये डेंग्यूच्या आजारासारखीच लक्षणे आढळत असल्याने रुग्णांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सावधगिरी गरजेची
भारतात अद्याप ‘झिका’चा एकही रुग्ण आढळला नसला तरी आपल्या देशातील तापमान आणि लोकसंख्या यामुळे या आजाराबाबत विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. हा विषाणू डासांमार्फत पसरत असल्याने डासांची उत्पत्तिस्थाने रोखणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण बिरासदार यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील ग्रामपंचायती तसेच नगरपालिका प्रशासनांनी परिसरातील गटारे स्वच्छ ठेवणे, धूर फवारणी, परिसरातील साचलेली डबकी बुजवणे यासारखे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा