काल्हेर आलीमघर खाडीत कारवाई

ठाणे  – मागील एक आठवड्यापासून दिवा मुंब्रा खाडीत वाळूमाफियांकडून दिवसा अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जात होता. जिल्हा प्रशासनाकडून वाळू माफीयांच्या या कृत्याकडे सर्रास डोळेझाक होत असल्याचे वृत्त लोकसत्ताने शुक्रवारी प्रकाशित केले होते. यानंतर उशिराने जाग आलेल्या प्रशासनाने शुक्रवारी दुपारी काल्हेर आलीमघर खाडीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईत माफियांचा ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कळवा रुग्णालयातील मृतांच्या शवविच्छेदनाचे अहवाल समितीने घेतले ताब्यात; दुसऱ्या दिवशीही चौकशी

खाड़ी पात्रातून होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी भरारी पथकांची स्थापना केली होती. या पथकांकडून  सुरुवातीच्या काळात अवैध उपसा करणाऱ्या माफियांविरोधात छापे टाकण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच या भरारी पथकांच्या कारवाईचा वेग मंदावला. यामुळे दिवा मुंब्रा खाडीपात्रातून अवैध पद्धतीने वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले आहे. तर, अवैध पद्धतीने उपसा करणाऱ्या सुमारे आठ ते दहा बोटी दिवा-मुंबा खाडीत गेले तीन दिवस सातत्याने दिसून येत आहे. तर नेहमीप्रमाणे रेल्वे पुलाखाली अवैध पद्धतीने उपसा सुरू आहे.

हेही वाचा >>> कल्याण : लोढा पलावा-निळजे दरम्यानचा रेल्वे बोगदा वाहतुकीसाठी बंद

याबाबतचे वृत्त लोकसत्ताने शुक्रवारी प्रकाशित केले होते. यानंतर जिल्हा महसूल विभागाकडुन शुक्रवारी भिवंडी तालुक्यातही काल्हेर आलीमघर खाडीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. खाडीमधील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी कडक कारवाई करण्याचे व गस्त घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे फिरते पथक व भिवंडी तहसील कार्यालय, भिवंडी मंडळ अधिकारी व भिवंडी व खारबाव तलाठी यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली. यामध्ये २ बार्ज, ३ संक्शन पंप आढळून आले. सर्व  बार्ज व संक्शन पंपचे वॉल काढलेले असल्याने ते किनारी भागात आणणे शक्य नसल्याने जागेवर जाळून खाडीमध्येच बुडवून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district administration takes action against sand mafia after news published in loksatta zws