ठाणे : जिल्ह्यात १३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी आणि १४ मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या धुलीवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश जाहीर केले आहेत. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे तसेच दहन करण्यास मनाई लागू करण्यात आली आहे. तर याच बरोबर पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकणे, पाण्याचे फुगे फेकणे, रासायनिक रंगांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावणे यासर्व गोष्टींवर १० ते २० मार्च या कालावधीत प्रशासनाच्या वतीने मनाई लागू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आदेश जाहीर केला आहे.
जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात होळी तसेच धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो. यावेळी विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून, गृहसंकुलांकडून तसेच राजकीय पक्षांकडून होळी दहनाचे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी सहजरित्या मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करून ठिकठिकाणी होळी दहन केले जाते. यामुळे अनेकदा आग लागण्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या धुलीवंदनाच्या दिवशी अनेकदा समाजकंटकांकडून हुल्लडबाजी करत रासायनिक रंगांचा वापर करणे, पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणे तसेच महिलांशी गैरवर्तन करणे यांसारखे अनेक गैरकृत्य केले जातात. याला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने १० ते २० मार्च या कालावधीत मनाई आदेश लागू केले आहे.
यावर जिल्हा प्रशासनाकडून मनाई
सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे, दहन करणे, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकणे अथवा उडविण्याचा प्रयत्न करणे. आरोग्यास अपायकारक होईल अशा रासायनिक रंगांचा वापर करणे. रंगांचे फुगे, पाण्याचे फुगे अथवा इतर द्रव पदार्थाचे फुगे अथवा प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर करुन फेकल्यामुळे आरोग्यास अपाय व जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे. सार्वजनिक जागेत अश्लील गाणी गाणे, घोषणा देणे, अश्लील शब्द उच्चारणे.
याचबरोबर सार्वजनिक जागेत विकृत हावभाव करणे किंवा वाकुल्या व विडंबनचे प्रदर्शन करणे अथवा ज्यामुळे एखाद्याची प्रतिष्ठा, योग्यता वा नैतिकतेला धक्का पोहचेल असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्पष्ट केले आहे.