ठाणे जिल्ह्यतील ११ छोटय़ा धरणांतील पाणी वापराविना पडून

वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, मात्र याच परिसरातील तब्बल ११ लहान धरणातील पाणी सध्या वापराविना पडून असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या ११ धरणांपैकी पाच धरणे मुरबाड, तर सहा धरणे शहापूर तालुक्यांत आहेत. या धरणांतील पाण्याचा वापर केला जात नसल्याने ‘धरण उशाला तरीही कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या धरणांतून पाणीयोजना राबवल्या तर त्याचा जिल्ह्यतील रहिवाशांना फायदा होऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी दिली आहे.

मूळच्या एकत्रित ठाणे जिल्ह्यत १५ लघुबंधारे आहेत. त्यांपैकी उसगाव आणि हत्तीपाडा हे दोन लघुपाटबंधारे आता पालघर जिल्ह्यत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आता १३ लघुधरणे आहेत. त्यांपैकी अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली धरण सध्या स्थानिक पालिका प्रशासनाच्या ताब्यात असून तिथून शहरात दररोज सात दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे तालुक्यातील भोज धरणही बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. उर्वरित सर्व ११ धरणे मुरबाड आणि शहापूर तालुक्यांत आहेत. लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने परिसरातील सिंचनासाठी या लघुपाटबंधारे योजना राबवण्यात आल्या. मात्र जिल्ह्यतील बहुतेक शेतकरी केवळ पावसाळी पिके घेतात. त्यातही गेल्या काही वर्षांत अनेकांनी परवडत नसल्याने शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा शेतीसाठी फारसा वापरच होत नाही. परिणामी धरणातील पाणीसाठा अगदी पुढील पावसाळा येईपर्यंत टिकून राहतो. विशेष म्हणजे या सर्व लघू धरणांच्या परिघातील गावांमध्ये जानेवारी ते जून या काळात भीषण पाणीटंचाई भेडसावते. स्थानिकांना कैक किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागते. त्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. घरातील महिलांचा सर्व दिवस पाण्याच्या मागे जातो. त्यापैकी बहुतेक धरणांवर परिसरातील महिला आठवडाभराचे कपडे साठवून धुवायला नेतात.

धरणे कुठे?

  • मुरबाड तालुका : वांजळे, ठाकूरवाडी, जांभूर्डे, मानिवली आणि खांडपे
  • शहापूर तालुका : मुसई, खराडे, डोळखांब, आदिवली, वेल्होळी आणि जांभे

(यांपैकी काही धरणांचे विस्तारीकरणही शक्य आहे. तसे झाल्यास ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न सुटेलच, शिवाय शहरी भागालाही पाणीपुरवठा करणे शक्य होऊ शकेल, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.)

हाकेच्या अंतरावर धरण असूनही शेजारील गावात भीषण टंचाई हे ग्रामीण भागाचे दुर्दैव आहे. या धरणांतून स्थानिकांना फक्त पिण्याचे पाणी मिळावे, अशी आमची मागणी आहे.

शरद उमवणे, युवाध्यक्ष, शाईविरोधी संघर्ष समिती, शहापूर.

((   डोळखांब धरण  ))

Story img Loader