ठाणे – मुंबईच्या शेजारी असलेला ठाणे जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासात अनेक आव्हाने आहेत. जिल्ह्याचे नागरीकरण झपाट्याने होत असून त्याबरोबरच मुरबाड, शहापूर सारखा आदिवासी भागाचा विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विकासाचे नियोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. तर ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग तसेच पालघर जिल्हयातील नागरिकांना आरोग्य विषयक सेवांसाठी ठाण्यामध्येच यावे लागते. जिल्ह्यातील आरोग्य विभागाची ही त्रुटी दाखवत रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य दिले असल्याची स्पष्टोक्ती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषण करताना रवींद्र चव्हाण यांनी भाषण करताना हे मुद्दे उपस्थित केले.

हेही वाचा >>> बदलापुरात शिवसेना भाजप युतीचेच संकेत; खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य,भरघोस निधी देण्याची घोषणा

ठाणे जिल्ह्यातून नाशिक, अहमदाबाद, पुणे जिल्ह्यांकडे जाणारे महामार्ग आहेत. या मार्गावर  होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामे घेण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उड्डाणपूल, रिंगरोड, मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या पायाभूत सुविधांना आणखी गती देण्यासाठी राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातही तरतूदी करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच  पालघर जिल्हयातील नागरिकांना आरोग्य विषयक सेवांसाठी ठाण्यामध्येच यावे लागते. त्यामुळे ठाण्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी उभारले जाणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  ठाणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. यामुळे अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर व त्या परिसरातील इतर भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे.  

हेही वाचा >>> ठाणे : तलाठी भरती परिक्षेसाठी केंद्रांच्या आवारात मनाई आदेश

ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे शहराच्या विकासासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक समूह विकास योजना (क्लस्टर डेव्हल्पमेंट) ठाणे महापालिका क्षेत्रात राबविली जात आहे. यामुळे अधिकृत व मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. बाळकूम येथे ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रांगणात उभे राहणाऱ्या या हॉस्पिटलसाठी ठाणे महापालिकेने जमीन उपलब्ध करून दिली आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हे कॅन्सर रुग्णालय संजीवनीच ठरणार आहे, असे ही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने भरीव निधीची तरतुद केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहर आस्थापनेवरीलअधिकाऱ्यांचा सन्मान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांचा रवींद्र चव्हाण हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ठाणे जिल्ह्यातील  अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकारांचाही जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. तसेच केंद्र शासनाकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पदक घोषित झाल्याबद्दल पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर आस्थापनेवरील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

यावर्षी झालेल्या प्रजासत्ताक दिनी आणि मागील वर्षी झालेल्या १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री घोषित होऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ध्वजारोहण करण्यात आले होते. शंभूराज देसाई हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र बहुतांश शासकीय कार्यक्रमांना त्यांची गैरहजेरी असते. यामुळे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बहुतांश शासकीय कार्यक्रम पार पडत असे. यंदा मात्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district face many challenges for development says pwd minister ravindra chavan zws
Show comments