रुग्णालयाच्या परिसरात जागोजागी बांधकाम साहित्याचा ढीग; दारूच्या बाटल्या, वैद्यकीय कचरा आणि प्लास्टिकचा खच
ठाणे जिल्ह्य़ाच्या आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय परिसराची पुरती दुर्दशा झाली असून रुग्णालय परिसरामध्ये जागोजागी बांधकाम साहित्याचा ढीग, दारूच्या बाटल्या, वैद्यकीय कचरा आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले असून त्यासाठी सुमारे ३९ लाख ८४ हजार रुपयांचा लाखांचा खर्च करण्यात आला आहे. इतका खर्च करूनही परिसरातील दुरवस्था कायम असून नियमित देखभाल दुरुस्तीच्या होत नसल्याने इथे येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रुग्णालयात प्रवेश करण्याच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून हे कचऱ्यांचे ढीग कायम असून त्यातून दरुगधीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे रुग्णालयात रोग बरा होण्याऐवजी इथे रोग्यांच्या आजारात ) आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांतील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसाला शेकडोच्या संस्थेने रुग्ण उपचारासाठी येत असतात. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रुग्णालयाच्या परिसरात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी स्वच्छता असणे अपेक्षित असले तरी सध्या स्वच्छतेचा लवलेशही परिसरात दिसून येत नाही. देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि शासकीय कार्यालये स्वच्छ होत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयात मात्र अस्वच्छता वाढीस लागली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून परिसरात प्रवेश केल्यानंतर डावीकडच्या इमारतींच्या बाजूस मोठय़ा प्रमाणात बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. हे ढीग गेली कित्येक दिवस या परिसरात जैसे थे अवस्थेत असून त्या ठिकाणी मच्छर आणि साथीचे रोग पसरवणाऱ्या कीटकांची निर्मिती होऊ शकते, तर त्यापुढे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाचा भाग असून त्या इमारतीच्या एका कोपऱ्यात मोठय़ा प्रमाणात कचरा एकत्र करून ठेवण्यात आला आहे. या कचऱ्यामध्ये इमारतींच्या तोडलेल्या साहित्यांबरोबरच दारूच्या बाटल्या, वैद्यकीय कचरा आणि प्लास्टिकचा खच मोठय़ा प्रमाणात आहे. हा ढीग प्रवेशद्वाराच्या अगदी समोर असल्याने त्यातून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दुरवस्थेची नागरिकांना पुरेपूर कल्पना येत आहे.
सुशोभीकरणाबरोबरच स्वच्छता हवी..
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी चकचकीत फरशांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे येथील परिस्थिती पूर्वीपेक्षा बदलली असली तरी येथे नियमित स्वच्छता होत नसल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागात किमान नियमित स्वच्छता केल्यास या सुशोभीकरणाचा फायदा झाला असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया इथे आलेल्या कल्पेश महाडिक याने सांगितले
सुशोभीकरणाचा निधीही पाण्यात..
जिल्हाधिकाऱ्यांच्या निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसराचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुमारे ३८.८४ लाखांचा निधी त्यासाठी खर्च करण्यात आला, मात्र या भागाची नियमित झाडलोटही होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याबरोबरच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहांचे मलवाहिनी पाइप काही ठिकाणी फुटल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात आजार बरा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाच आजाराचा त्रास निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.