ठाणे : कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये किंवा मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना धावाधाव करावी लागते. परंतू, ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडणारा नसतो तसेच ते मुंबईत टाटा रुग्णालयातही उपचारासाठी जाण्यास टाळाटाळ करतात. ग्रामीण भागातील कर्करुग्णांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने कर्करोग निदान मोबाईल बस गेल्याकाही दिवसांपासून सुरु केली आहे. या बसच्या माध्यमातून दररोज सुमारे १०० ते १२० रुग्णांची मौखिक, स्तन आणि गर्भाशय पिशवी कर्करोग तपासणी केली जात आहे.
कर्करोगाची लक्षणे पटकन समजून येत नाही. त्यामुळे अनेक जण निर्धास्तपणे वावरत असतात. कर्करोगाचे निदान झाल्यावर मनात शंका आणि भिती निर्माण होते. त्यामुळे वेळोवेळी शारीरिक तपासणी केली तर, कर्करोगातून बचाव करता येणे शक्य आहे. परंतू, ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना या रोगाच्या चाचण्याचा खर्च परवडणारा नसतो. तसेच ते शहरात सरकारी रुग्णालयात येण्यास देखील टाळाटाळ करतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी कर्करोग निदान मोबाईल बस गेल्या काही दिवसांपासून सुरु केली आहे. ही मोबाईल बस सध्या ठाणे जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये फिरत असून या बसच्या माध्यमातून दररोज १०० ते १२० रुग्णांची कर्करोग तपासणी केली जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यदंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.
कर्करोग मोबाईल बसचे स्वरुप
या कर्करोग मोबाईल बसमध्ये रुग्णांची मौखिक, गर्भाशय आणि स्तन याची तपासणी करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ, दंतवैद्य, परिचारिका आणि आरोग्य सेवक यांची टीम असते. तसेच यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना या मोबाईल बसमध्ये तात्काळ प्राथमिक उपचार केले जातात. ९ फेब्रुवारीपासून ही मोबाईल बस जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरत आहे. गावागावांमध्ये मोबाईल बस जाण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. अर्चना पवार यांनी दिली.
कर्करोग निदान मोबाईल बस मध्ये अत्याधुनिक यंत्रणा ठेवली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस फिरणार आहे. या बसचा फायदा दुर्गम भागातील नागरिकांना होत असून वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यावर रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य झाले आहे. डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे