ठाणे – प्रसुती म्हटले की, महिलेचा एकप्रकारे पुनर्जन्मच असतो. त्यातच अनेक महिलांना प्रसुतीदरम्यान होणाऱ्या वेदना असहनीय असतात. त्यामुळे महिलांना प्रसुतीदरम्यान होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी बहुंताश खाजगी रुग्णालयाचा कल हा सर्वाधिक शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यावर असतो. त्यातच आता, शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करणे ही एक पद्धतच रूढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीपेक्षा सामान्य प्रसुतीलाच पहिली पसंती दिली जात आहे. मागील दहा महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात २६ हजार ५६९ प्रसुतींपैकी २२ हजार ८१० नैसर्गिक प्रसुती करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीच्या काळातही नैसर्गिक प्रसुतीवर भर देत जिल्हा सामन्य रुग्णालयाने आपले एक वेगळेपण जपले आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते अडीच वर्षांपासून करोनाच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड १९ रुग्णालयात रुपांतर केले होते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यातच या कालवधीत केवळ करोना बाधित गरोदर महिलांच्या प्रसुती करण्यात येत होत्या. त्यामुळे त्याचा अधिक भार या कालावधीत ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर पडत होता. अशातच करोनाचा प्रादुर्भाव ओसरताच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सर्व सामान्य आजारावरील रुग्णांवरील उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर गरोदर मतांच्या प्रसुतीदेखील करण्यात येत आहे.
हेही वाचा – ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टींवरील स्थलांतरित मजुरांची मुले शैक्षणिक सुविधांपासून वंचित
दरम्यान, महिलांना प्रसुतीदरम्यान होणाऱ्या वेदना असहनीय असतात. महिलांना प्रसुतीदरम्यान होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी बहुंताश खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीला पसंती देण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करणे ही एक पद्धतच रूढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीच्या जमान्यात आपले एक वेगळेपण जपले आहे. गरोदरपणात गुंतागुंतीची परस्थितीच्या काळातच अथवा आणीबाणीच्या काळात शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती केली जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या दहा महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसह गुंतागुंतीच्या केसेसदेखील काळजीपूर्वक हाताळत २६ हजार ५६९ प्रसुती करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. यामध्ये सर्वाधिक २२ हजार ८१० प्रसुती या नैसर्गिक पद्धतीने करण्यात आल्या. तर, ३ हजार ७५९ प्रसुती या शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आल्या असल्याची माहिती ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली.
हेही वाचा – पूर्व द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू
अनेक महिलांच्या मनात प्रसुतीच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांची भीती सतावत असते. ही भीती दूर करून त्यांची नैसर्गिक प्रसुती करण्यावर डॉक्टरांकडून भर देण्यात येत असतो. मात्र, प्रसुतीच्या काळात गुंतागुंतीची परस्थिती उद्भवल्यानंतरच शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचा पर्याय निवडला जात आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाकडून महिलांच्या मनातील प्रसुतीबाबत असलेला गैरसमज दूर करून नैसर्गिक प्रसुतीवर भर देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक गरोदर महिलेनेदेखील आठव्या महिन्यापासून मानसिक आणि शारीरिक तयारी करणे गरजेचे आहे, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अर्चन अखाडे म्हणाल्या.