पूर्वा साडविलकर- भालेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचे रुग्ण मृत्युप्रकरणानंतर उघड होताच येथील रुग्णांना ठाणे जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यास सुरूवात झाली. त्याचबरोबर रुग्ण मृत्यु प्रकरणाच्या धसक्यामुळे अनेक रुग्ण कळवा रुग्णालयात उपचार घेणे टाळत असून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढल्याने याठिकाणी आणखी शंभर रुग्ण उपचार खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. पाचशे खाटांचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर टिका झाली होती. या घटनेची राज्यभर चर्चाही झाली होती. त्याचबरोबर या रुग्णालयातील अतिदक्षता आणि सामान्य कक्षात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची बाब समोर आली होती. ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर नवीन सुपर स्पेशलिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे हे रुग्णालय मनोरुग्णालयाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहे. अनेकजण याविषयी अनभिज्ञ असल्याने कळवा रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढला होता तर, जिल्हा रुग्णालयातील अनेक खाटा रिकाम्या असल्याचे समोर आले होते.

हेही वाचा >>> “देवी महाराष्ट्रातील महिषासुरांचे मर्दन केल्याशिवाय राहणार नाही”; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

कळवा रुग्णालयाचा भार कमी करण्यासाठी येथील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आजही रुग्ण स्थलांतरित करण्याचे काम सुरूच आहे. त्यासाठी कळवा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या समन्वयातून हे काम सुरू आहे. असे असतानाच, अनेक रुग्ण कळवा रुग्णालयात उपचार घेणे टाळत असून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होत असल्याचे समोर आले आहे. एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. या घटेनचा अनेकांनी धसका घेतला आहे. या घटनेच्यावेळेस कळवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाला तिच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी कळवा रुग्णालयात तिच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरु होते, असे समोर आले होते. या सर्व प्रकारामुळे कळवा रुग्णालयाविषयी अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली असून यामुळेच ते कळवा रुग्णालयाकडे पाठ फिरवून ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणे पसंत करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे: देवी आगमन मिरवणुकीत दोन मंडळात राडा; दगडफेक आणि फटाके पेटविल्याने पाच जखमी

मनोरुग्णालयाच्या जागेत स्थलातरित करण्यात आलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालय ३३६ खाटांचे आहे. या खाटा विविध विभागात अवश्यकतेनुसार ठेवण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. तसेच कळवा रुग्णालयातूनही अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील भार वाढला आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात आणखी १०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. या १०० खाटा अवश्यकतेनुसार विविध विभागात ठेवण्यात येणार आहेत. येत्या तीन महिन्यात हे काम पुर्ण होईल. त्याचबरोबर अवश्यकतेनुसार डॅाक्टरांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात वातानुकूलित असा एक कक्ष तयार करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कळवा रुग्णालयातील काही रुग्णांना याठिकाणी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील खाटा वाढविण्यात येत आहेत. – डाॅ. कैलास पवार, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district hospital patient load increased decision to increase hundred additional beds ysh
Show comments