राज्य सरकारने अनलॉकसाठी ५ टप्प्यांचं नियोजन केलं असून त्यानुसार राज्यातील जिल्हे आणि महानगरपालिका यांचं वर्गीकरण ५ गटांमध्ये करण्यात आलं आहे. पहिला गट ते पाचवा गट यामध्ये प्रत्येक गटानुसार निर्बंध कठोर होत जातील. यानुसार राज्यातील जिल्ह्यांच्या वर्गीकरणामध्ये मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्याचा समावेश देखील तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला आहे. यानुसार, ठाणे महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका हे स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून वगळता संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटात असेल. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाने करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपला जिल्हा किंवा महानगर पालिका कोणत्या गटामध्ये येणार, याविषयी आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीनुसार ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश!
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यासंदर्भात आदेश काढले असून त्यानुसार ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या गटासाठीचे निर्बंध आणि सूट लागू करण्यात येणार आहेत. याशिवाय, ठाणे महानगर पालिका क्षेत्राचा समावेश दुसऱ्या गटात, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा समावेश तिसऱ्या गटात, तर नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्राचा समावेस दुसऱ्या गटात करण्यात आला आहे. त्यामुळे या महानगर पालिका क्षेत्रांना त्यानुसार निर्बंधांचे किंवा सूटचे नियम लागू होतील.
ठाणे जिल्ह्यासाठी काय असतील नियम?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र प्रशासकीय घटक वगळता उर्वरीत ठाणे जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे निर्बंध लागू असतील:
१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
२. इतर वस्तूंचे व्यवहार करणारी कार्यालये सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
३. मॉल्स, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन, नाट्यगृहे बंदच राहतील.
४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेनं संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. संध्याकाळी ४ नंतर किंवा शनिवार-रविवारी फक्त टेक अवे किंवा पार्सल सुविधेची परवानगी असेल.
५. लोकल सेवेसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेले आदेशच लागू राहतील.
६. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंगसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.
७. सूट देण्यात आलेली अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळता इतर खासगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
८. शूटिंग बबलच्या आत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. संध्याकाळी ५ नंतर कुणालाही हालचाल करता येणार नाही.
९. सामाजिक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, करमणूक कार्यक्रम ५० टक्के बैठक क्षमतेनं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहील.
१०. लग्नसमारंभासाठी ५० लोकांची मर्यादा, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांची मर्यादा असेल.
११. संध्याकाळी ५ पर्यंत जमावबंदी आणि संध्याकाळी ५ नंतर संचारबंदी लागू असेल.
१२. व्यायामशाळा, सलून, ब्युटी सेंटर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स संध्याकाळी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. पण गिऱ्हाइकांना आधी वेळ ठरवून यावं लागेल.
१३. सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के आसनक्षमतेनं सुरू राहील. उभे राहून प्रवास करण्यास बंदी.
१४. खासगी गाडीने पाचव्या गटातील ठिकाणी किंवा त्या ठिकाणाहून जायचे असल्यास ई पास आवश्यक.
याव्यतिरिक्त उत्पादनविषयक, तसेच प्रवासविषयक सविस्तर नियमावली या आदेशामध्ये देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉक! पण कशी होणार आकडेमोड? वाचा सविस्तर!

ठाणे महानगर पालिका दुसऱ्या गटात
दरम्यान, ठाणे जिल्ह्याप्रमाणेच ठाणे महानगर पालिकेने देखील पालिका क्षेत्रासाठी आदेश जारी केला आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील एकूण पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी याची संख्या पाहाता ठाणे महानगरपालिकेचा समावेश दुसऱ्या गटामध्ये केला आहे. त्यामुळे दुसऱ्या गटासाठी जे नियम राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत, ते नियम ठाणे महानगर पालिका क्षेत्रासाठी लागू असतील, असं या आदेशांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. नवीन आदेश ७ जून रोजी सकाळपासून लागू करण्यात येतील.
दुसऱ्या गटासाठीचे नियम
या गटात जे जिल्हे असतील तिथे सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटसाठीही ५० टक्के क्षमतेने परवानगी. लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील. चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.
काय आहे निकष?
त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची तसेच ऑक्युपाईड म्हणजेच सध्या रुग्ण असलेल्या बेडची संख्या किती आहे, त्यावरून ५ गटांमध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार…
पहिला गट – ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
दुसरा गट – ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
तिसरा गट – ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
चौथा गट – १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
पाचवा गट – २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी