ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरे एकमेकांना जोडण्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम ३ टक्के इतकीच झाले असून वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी दोन वर्ष तर, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी चार वर्षे नागरिकांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील रस्ते तसेच रेल्वे वाहतूकीवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून राज्य सरकारने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेट्रो प्रकल्पाचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला. या नुसार, ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची घोषणा करण्यात आली असून या सर्व प्रकल्पांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहेत. मेट्रोच्या माध्यमातून जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, मिरारोड यासह तळोजा परिसर एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. परंतु या सर्व प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही वर्षे मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले होते. सुमारे ३२ किमीचा हा मार्ग असून नोकरदार वर्गासाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या मार्गाची स्थापत्य कामे ७५ टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित २५ टक्के कामे एप्रिल २०२७ मध्ये पूर्ण होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गालाच जोडण्यात येत असलेल्या २.७ किमी लांबीच्या कासारवडवली ते गायमुख मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे ८६ टक्के पूर्ण झाली आहेत तर, १४ टक्के कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.

ठाणे- भिवंडी मार्गाचे काम

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पामुळे तीन शहरे एकमेकांना जोडली जाणार असून हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे. २३.५ किमी लांबीचा हा प्रकल्प असून त्याचे काम २०१९ मध्ये हाती घेण्यात आले होते. या मार्गाची कामे दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडी पर्यंतच्या मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या मेट्रो मार्गावरील स्थापत्य कामे ९४ टक्के पूर्ण झाली आहे. तर, भिवंडी ते कल्याण परिसराला जोडणारी मार्गिकेच्या कामाबाबत मात्र, अहवालात माहिती देण्यात आलेली नाही. या मार्गिकेचे का। पूर्ण होण्यासाठी २०२९ उजाडेल असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.

मिरारोड येथील गायमुख ते शिवाजी चौक या मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याचा उल्लेख करत हे काम डिसेंबर २०२७ मध्ये पूर्ण होईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. नवी मुंबई सीबीडी बेलापूर ते पेंधर ही मेट्रो सेवा सुरू झाली असली तरी कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम ३ टक्के इतकीच झाल्याची बाब अहवालातून समोर आली आहे.

Story img Loader