ठाणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठाणे पालिकेने २१ हजार ५००, कल्याण-डोंबिवली महापालिकेने १८ हजार, उल्हासनगर पालिकेने १६ हजार ५०० तर, भिवंडी महापालिकेने १३ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर सुमारे सात हजार अधिकारी-कर्मचारी आहेत. तर अडीच हजारांच्या आसपास कंत्राटी कर्मचारी आहेत. गेल्यावर्षी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १८ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे तर, कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून देण्यात यावा, अशी मागणी ठाणे म्युनिसिपल लेबर युनियनने पालिका प्रशासनाकडे केली होती. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सुद्धा आयुक्त अभिजीत बांगर यांना तसे पत्र दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आयुक्त बांगर यांनी महापालिका अधिकारी-कर्मचारी, परिवहन सेवेतील कर्मचारी, पालिकेतील कंत्राटी कामगारांना २१ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील साडे सहा हजार कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी घोषणा महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी नुकतीच केली. सुमारे सहा हजार ५०० कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. भिवंडी महापालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सोमवारी जाहीर केले. उल्हासनगर पालिकेने १६ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
हेही वाचा >>>ठाण्यात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा सेविकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी भाऊबीज भेट मध्ये २० टक्के वाढ करुन त्यांना रुपये ६ हजार इतकी रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.