ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी १२ नंतर ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. या वाढत्या तापमानाचा फटका ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना बसू लागला आहे. काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ- उतारामुळे नागरिकांना अंगदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखणे, तापाची लक्षणे दिसू लागली आहेत. असे ६० ते ७० रुग्ण दिवसाला येत असल्याची माहिती ठाण्यातील एका खासगी डॉक्टरांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसात २८ अंश सेल्सियस ते ३२ अंश सेल्सियस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत होता. परंतू, दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी दहा वाजताच्या नंतर उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होत आहे. तीन दिवसांपूर्वी ठाणे शहरातील तापमानातही वाढ झाली होती. जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी १२नंतर ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. या उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते. त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर साखरयुक्त पेय पिणे गरजेचे आहे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

या तापमान वाढीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्दी,खोकला,ताप अंगदुखी, घसा दुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील छोट्या दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांची संख्या खासगी दवाखान्यात अधिक आहे. या आजाराने त्रस्त असलेले ६० ते ७० रुग्ण दिवसाला दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती कोपरी भागातील डॉ. नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

काळजी कशी घ्याल?

ऐन हिवाळ्याच्या दिवसात तापमान वाढले असले तरी थंड पेयाचे सेवन करणे टाळले पाहिजे. सर्दी खोकला झाला असल्यास दररोज वाफ घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर केला पाहिजे.तापमानवाढीमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, अंग दुखणे हे आजार होत असतात. या आजारातून बरं होण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी तसेच तोंडावर स्कार्फ किंवा मुखपट्टी लावूनच बाहेर पडले पाहिजे. शक्यतो दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, अशी काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे.डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे