पर्यायी जागा मिळूनही स्थलांतर करण्यास चालढकल; कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांच्याही सुरक्षेला धोका
ठाणे जिल्ह्य़ातील चार हजारांहून अधिक इमारतींमध्ये धोकादायकपणे वास्तव्य करीत असलेल्या लाखो लोकांचा जीव टांगणीला लागलेला असतानाच गृहनिर्माण सोसायटय़ांचा कारभार ज्या शासकीय खात्यामार्फत चालतो, ते जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालयही कोसळण्याच्या बेतात असलेल्या जीर्ण वास्तूंमध्ये सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठाणे शहरातील शिवाजी पथावर वर्धावत मेन्शन या धोकादायक इमारतीच्या पहिल्या तसेच दुसऱ्या मजल्यावर जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय आहे. इमारत धोकादायक असल्याने तालुका निबंधक कार्यालय गेल्या एप्रिल महिन्यामध्ये येथून मीरा रोडला स्थलांतरीत झाले. मात्र शहर निबंधक कार्यालय मात्र हाकेच्या अंतरावरील गावदेवी मंडई इमारतीत पर्यायी जागा मिळूनही स्थलांतरित झालेले नाही. या कार्यालयामध्ये ३० ते ४० कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच कामकाजानिमित्त येथे दररोज सरासरी शंभरएक नागरिक येत असतात. अनेक सोसायटय़ांचे महत्त्वाचे दस्तऐवज या मोडकळीस आलेल्या वास्तूत असून इमारत कोसळली तर जीवितहानीबरोबरच कागदपत्रेही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे.
धोकादायक इमारती तातडीने खाली करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी रहिवाशांना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत भाडेकरूंचा घरावरील ताबा कायम राहावा म्हणून त्यांना महापालिकांच्या वतीने हमीपत्रे देण्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. अशा प्रकारे शासन आणि प्रशासन धोकादायक निवासाचा प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण सोसायटय़ांच्या कारभार ज्या खात्यामार्फत चालतो, ते जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय मात्र केवळ हमीच नव्हे तर प्रत्यक्ष जागा मिळूनही गेल्या तीन महिन्यांत का स्थलांतरित झाले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील पाच हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायटय़ांच्या प्रतिनिधींना त्यांच्या वार्षिक सभा, लेखा परीक्षण अहवाल आदी कामांसाठी या कार्यालयात ये-जा करावी लागते. त्यासाठी डिम्ड कन्व्हेयन्स आवश्यक असल्याने सध्या या कामासाठीही अनेक सोसायटीच्या सभासदांचा येथे राबता असतो. केवळ नाइलाज म्हणून तुटक्या पायऱ्या आणि कठडे गायब झालेल्या डुगडुगत्या जिन्याने पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर नागरिकांना हेलपाटे घालावे लागतात.
महापालिकेने गावदेवी येथील भाजी मंडई इमारतीच्या वरील सभागृहातील साडेतीन हजार चौरस फूट जागा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दिली आहे. मात्र ते संपूर्ण सभागृह १२ हजार चौरस फुटांचे आहे. त्यातील आम्हाला मंजूर झालेल्या जागेपुरते पार्टिशन तसेच इतर फर्निचरची कामे सध्या सुरू आहेत. येत्या महिन्याभरात ही कामे पूर्ण होऊन हे कार्यालय तिथे स्थलांतरित होईल.
– दिलीप उडाण, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे</strong>