ठाणे : जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच विविध शहरात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ३२ हून अधिक रूग्णांची शासनाच्या दफ्तरी नोंद झाली आहे. मात्र यात रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने चांगला जोर धरला. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये हळुहळू वाढ होते आहे. पावसामुळे मोकळ्या आणि सखल भागात पाणीही साचते आहे. नैसर्गिक नाले प्रवाही झाले आहेत. त्याचवेळी शहरात रहिवासी भागांमध्ये मोकळ्या, सखल भागात, निर्माणाधीन इमारती, मोडकळीस आलेल्या आणि बंद घरांमध्येही पाणी साचू लागले आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३२ रूग्णांची नोंद झाली आहे. यातील डेंग्यु सदृश्य रूग्णांची संख्या मोठी आहे.

हेही वाचा…ठाण्यात पाणी टंचाईचे संकटात भर, मुख्य वितरण व्यवस्थेमध्ये बिघाड

अनेक जण लक्षणे दिसल्यास खासगी स्तरावर उपचार घेत असल्याने अशा अनेकांची नोंद स्थानिक पालिका प्रशासनाच्या लेखी नाही. गेल्या आठवडाभरात ठाणे जिल्ह्यात १० डेंग्यु रूग्णांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र त्याचवेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात एकट्या बदलापूर शहरात १२ डेंग्यु रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यु रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यातही एकाच घरात एकापेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होते आहे. तर जिल्ह्यात मलेरियाच्या रूग्णांची संख्याही २० वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ताप उद्रेकाच्या ठिकाणी जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. हिवताप बाधित रुग्ण आढळ्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील रक्त तपासणी साठी पाठवण्यात येत आहेत. तर भिवंडी मध्ये इतर शहरांतून कामासाठी येणाऱ्या मजुरांचे प्रमाण अधिक आहे. या मजुरांचे देखील सर्वेक्षण करण्यात येत आहे. तर ग्रामीण भागातील नाले, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. तर ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गप्पी माशांचे एक पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत.

हेही वाचा…सासुच्या छळाने त्रस्त पोलीस पत्नीची कल्याणमध्ये आत्महत्या

आरोग्य विभाग तपासणी पुरताच मर्यादीत

जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमधील आरोग्य विभाग हा डेंग्युचे रूग्ण आढळ्यानंतर तपासणी करत रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सल्ले देण्यापुरताच मर्यादीत असल्याचे दिसून येते आहे. रूग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पथक रूग्णाच्या घरी जाऊन साचलेल्या पाण्याचे साठे तपासते. एखादी कुंडी, पाण्याची भांडी आढळल्यास त्यावरून रूग्णाच्या कुटुंबियांना सुनावले जाते. मात्र त्याचवेळी इमारतींच्या शेजारी असलेली डबकी, निर्माणाधीन इमारतींचे मालक यांना मात्र समज दिली जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district sees surge in dengue and malaria cases amid heavy rains administration urges caution psg
Show comments