कल्याण – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याचा अधिकप्रमाणात वावर असलेल्या एकांतांंमधील घरांमधील कुटुंबीय, पशुधन यांना बिबट्यापासून धोका आहे. अशा संवेदनशील एकांतात असलेल्या शेतशिवार, माळरानांवरील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने तयार केला आहे. शासन मंजुरीच्या आवश्यक त्या पूर्तता झाल्यावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, माळेशज, कसारा घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. जंगलात लाकूडफाटा, वनोपज गोळा करणे, शेतकरी, गायी, शेळ्यांच्या गोरक्षकांवर यापूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्या आणि मानवी वस्तीमधील हा संघर्ष वाढत चालला आहे. भक्ष्य शोधण्यासाठी अनेक वेळा रात्रीच्या वेळेत बिबटे गाव हद्दीतील गोठ्यांमध्ये येऊन पशुधन, भटक्या श्वानांवर हल्ले करतात. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी मनुष्य, पशुधन हानी रोखण्यासाठी शहापूर वन विभागाने शहापूर तालुक्यातील बिबट्यांचा वावर, चलत मार्ग असलेल्या काही गावांंमधील एकांतात असलेली घरे निश्चित केली आहेत. बिबट्याचा वावरामुळे या घरांचा परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे. अशा एकांत वस्तीत बिबट्याने शिरकाव केला तर त्याला वेळीच सुरक्षितपणे, कोणत्याही प्रकारचा त्रास न होता अटकाव व्हावा या उद्देशातून वन विभागाने संवेदनशील घरांंभोवती सौरकुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वन विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा – ठाकरे गट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सक्रिय

सौरकुंपण प्रस्ताव

सौरकुंपण प्रस्तावाप्रमाणे एक एकर शेती परिसरात घर, गुरांचा गोठा असेल तर त्याला संरक्षित करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. या निधीतील ७५ टक्के रक्कम शासकीय अनुदानातून शेतकऱ्याला दिली जाईल. उर्वरित २५ टक्के रक्कम शेतकऱ्याने स्वता उभारून हा प्रकल्प आकाराला आणायचा आहे. या प्रकल्पासाठी देखभाल दुरुस्तीसाठी नियमितचा खर्चही असणार नाही. बिबट्याचा वावर असलेल्या एकांतामधील घर, गोठ्याला कुंपण घातले जाईल. त्या कुंपणाच्या आतील भागात सौरपट्ट्या बसविल्या जातील. सौरपट्यांमधून तयार होणारी सौर वीज विजेरीमधून (बॅटरी) कुंपणात सोडण्यात येईल. अचानक दिवसा, रात्री अन्य वन्यजीव किंवा बिबट्या एकांतामधील घर परिसरात भक्ष्यासाठी आला. त्याचा स्पर्श सौरकुंपणाला झाला की वन्यजीव किंवा बिबट्याला शाॅक बसेल आणि त्याचवेळी सौर यंत्रणेवर चालणारा भोंगा वाजण्यास सुरुवात होईल. शाॅक बसल्याने बिबट्या पळून जाईल आणि भोंग्यामुळे शेतकरी जागा होईल. या प्रकल्पामुळे बिबट्या पण सुरक्षित आणि शेतकऱ्याचे कुटुंब, पशुधन एकांतात असले तरी सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे, असे वनाधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – येऊरमध्ये पुन्हा धिंगाणा

या पथदर्शी प्रकल्पामुळे बिबट्या किंवा वन्यजीवांस कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही. त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होणार नाही याची विशेष काळजी या प्रकल्पात घेण्यात आली आहे. अलीकडे एकांतामधील घर परिसरात लोखंडी जाळीचे कुंपण करण्यासाठी दोन ते अडीच लाख खर्च येतो. त्याच जागी सौरउर्जेच्या माध्यमातून सौर कुंंपण उभारण्याचा प्रयत्न केला तर शासकीय आर्थिक साहाय्याने तीस हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे बिबट्या, मानवातील संघर्ष थांबविण्यासाठी राबविण्यात येणारा शहापूर वनविभागाचा हा प्रस्ताव आदर्शवत ठरण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district shahapur taluka leopard solar energy fence ssb