ठाणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा ११ आणि २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३३८ तर बारावीच्या परीक्षेसाठी १९७ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकाची नजर असणार आहे. शिवाय ज्या परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली होतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात दहावीकरिता ३३८ परीक्षा केंद्रे असून १ लाख ३ हजार ७१८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर बारावी परीक्षेकरिता १९७ परीक्षा केंद्रे असून १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट आहेत. परीक्षा कामकाज २० परिरक्षक केंद्रांमार्फत होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाअंतर्गत भरारी पथक तसेच आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय तालुका तसेच पालिका स्तरावर स्वतंत्रपणे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खातेप्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केले आहे. परिक्षादरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांनी दक्षता घ्यावी, त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत.

परिक्षा केंद्रावर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची डिजिटल उपस्थिती घेण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेर्याद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर प्रशासनामार्फत आवश्यकतेनुसार व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात आवश्यकतेप्रमाणे १४४ कलम लागू करण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Story img Loader