ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात ६ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे काही महिन्यापूर्वी पाठविला होता. त्यानंतर राज्यात लागलेल्या निवडणुका, आचार संहिता यामुळे हा प्रस्ताव बारगळला होता. मात्र आता या शहरांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी लागणाऱ्या ४९२ कोटी ८९ लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून नुकताच निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाला जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी या यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे.

ठाणे जिल्ह्याची व्याप्ती पाहता ठाणे पोलिसांना जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी कायम सतर्क राहावे लागते. मात्र जिल्ह्याची लोकसंख्या पाहता त्याच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये अनेकदा चोरी, घरफोडी, दुकानफोडी यांसह मारहाण, हत्या, अपघात यांसारखे गंभीर रूपाचे गुन्हे देखील घडत असतात. अशा वेळी घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्यास पोलिसांना तपास करणे सोयीचे ठरते. मात्र सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यास पोलिसांची गुन्हेगाराला शोधण्यात मोठी दमछाक होते आणि गुन्हेगारांना देखील यामुळे मोकळे रान मिळते. तर अनेक वाहन चालकांकडून बेदरकारपणे गाडी चालवून वाहतुकीचे नियम सर्रास मोडत असतात. तर यामुळे अनेक पादचाऱ्यांना आणि इतर वाहनचालकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागते. यासर्वांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांत सीसीटीव्ही यंत्रण बसविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. यानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ १ ते ५ या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या ४९२ कोटी ८९ लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून नुकताच निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे शहर अडकले वाहतूक कोंडीत, पालिका अधिकाऱ्यांना जोरबैठका सुरू

ठाणे महापालिकेने शहरात १७५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत मात्र ही संख्या अत्यंत कमी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरात स्मार्टसिटी अंतर्गत एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ठाणे आणि कल्याण वगळता इतर शहरात शासकीय योजनेतून सीसीटिव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत.

जिल्ह्यातील १ हजार ९९७ ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. शहरातील सिग्नल परिसर, मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय तसेच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होणार आहे.

हेही वाचा…सात लाखाची लाच मागणाऱ्या कल्याणमधील पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा

कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य काय ?

यामध्ये स्थिर कॅमेरे, ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे, लांबून तसेच अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे, वाहनांच्या वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेरे,अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार असून ते ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत.

कोणत्या भागात किती कॅमेरे

शहरे – सीसीटीव्हींची संख्या
ठाणे ते दिवा – ३१६३
भिवंडी- १,३४७

हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात डेंग्यु, मलेरियाने डोके वर काढले; रूग्ण संख्येत वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

उल्हासनगर ते बदलापूर – १,५४१

एकूण – ६०५१