कल्याण – वार्षिक नुतनीकरणाच्या प्रक्रिया पूर्ण करावयाच्या असल्याने ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील सुमारे ३० ते ३५ टोईंग व्हॅन मागील काही दिवसांपासून बंद आहेत. शहरात नियमबाह्यपणे उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक वाहतूक विभागाकडून टोईंग व्हॅन फिरविण्यात येतात. ही वाहने बंद असल्याने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरात रस्तोरस्ती नियमबाह्यपणे वाहने उभी केली जात असल्याचे चित्र आहे.
वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन बंद असल्याची माहिती मिळाल्याने वाहन चालक बाजारपेठेत आपली दुचाकी, चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी करत आहेत. त्यामुळे शहरांमध्ये वाहन कोंडीचा प्रश्न वाढला आहे. शहरात टोईंग व्हॅनच्या दिवसभर घिरट्या सुरू असल्याने आपल्या वाहनावर कारवाई नको म्हणून वाहन चालक सुरक्षित ठिकाणी आपले वाहन उभे करत होते. व्हॅन बंद असल्याने शहरांमध्ये नियमबाह्यपणे वाहने उभी केली जात आहेत. रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठांमध्ये आडवी तिडवी वाहने उभी केली जात असल्याने व्यापारी, रेल्वे स्थानकात जाणारे प्रवासी त्रस्त आहेत.
u
चालक प्रतीक्षेत
टोईंग व्हॅन चालविणाऱ्या वाहनांचे मालक ही वाहने लवकर सुरू व्हावीत यासाठी वाट पाहत आहेत. एक वाहनावर सुमारे चार ते पाच कामगार तैनात असतात. या कामगारांचे मानधन मालकाला वाहने बंद असली तरी द्यावे लागते. असा प्रशिक्षित कामगार पुन्हा मिळत नाही. त्यामुळे वाहन बंद काळातील मानधन आम्ही त्यांना देतो, असे एका टोईंग व्हॅन मालकाने सांगितले.
नुतनीकरण प्रक्रिया
दर वर्षी टोईंग व्हॅन चालविणाऱ्या वाहन मालकांच्या कागदपत्रांचे नुतनीकरण, त्यांचे शासना बरोबरचे करार वाढून घेण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. ठाणे जिल्ह्यात विविध शहरांमध्ये सुमारे ३५ हून अधिक टोईंग व्हॅन धावतात. या वाहनांचे नुतनीकरण, करार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, त्या कागदपत्रांची छाननी, वाहनांची सक्षमता तपासणी, प्रमाणीकरण या सर्व गोष्टींसाठी वेळ जातो. त्यामुळे हा विलंब होत असल्याचे वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, आता नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनासाठी गेलेला वाहतूक विभागाचा कर्मचारी यामुळे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही कामे आहे त्या मनुष्यबळात पूर्ण करण्याचे प्रयत्न वाहतूक विभागाकडून केले जात आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
टोईंग व्हॅन मालकांबरोबरचे अकरा महिने कालावधीचे करार संपले आहेत. त्यांच्या बरोबर नुतनीकरण, सेवा करार करायचे आहेत. वाहन कालावधीचे विषय आहेत. या सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्या की दोन-तीन दिवसात ही वाहने पूर्ण क्षमतेने सुरू होतील. – पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे.