ठाणे – मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात दोन डायलिसीस यंत्र बसवून सुमारे दीड वर्षांपूर्वी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रामुळे शहापूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र येथील सरकारी अनास्था आता रुग्णांसाठी मोठी गैरसोयीची ठरू लागली आहे. या डायलिसिस केंद्रात उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरच पूर्णवेळ उपलब्ध नसल्याने रुग्णांनी यासरकारी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. गेल्या दिड वर्षाच्या कालावधीत महिन्यातून केवळ एक ते दोन रुग्णच या ठिकाणी उपचारासाठी येत असल्याची माहिती उघड झाली आहे.
राज्यातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसीस सुविधेसाठी राज्यात ३५ नवीन डायलिसीस केंद्रे सुरू करण्याचा राज्याच्या आरोग्य विभागातर्फे सुमारे अडीच वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयांतर्गत कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या चार जिल्ह्यांमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ७ नवीन डायलिसीस केंद्रे सुरू करण्यात येणार होती. यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, रायगड जिल्ह्यात आठ, तर रत्नागिरी जिल्ह्यात चार असे एकूण १६ डायलिसीस यंत्र बसविण्यात येणार होती. यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एक डायलिसीसकेंद्र नव्याने सुरू करण्यात आले. शहापूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. याठिकाणी सक्षम आरोग्य यंत्रणा असणे महत्वाचे आहे. याच पार्श्ववभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात दोन डायलिसीस यंत्रे आणि ५०० लिटर क्षमतेचा एक आरओ प्रकल्प बसविण्यात आला आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या १४ अन्य उपकरण खरेदीसाठी देखील राज्य शासनाने मान्यता दिली होती. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे शहरी भागांबरोबरच ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा मिळणार होता. मात्र नेहमीप्रमाणे शासकीय अनास्थामुळे रुग्णांना केंद्र असून सुद्धा इतर खासगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे.
विशेष डॉक्टरांची कमतरता
शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसीस उपचारासाठी लागणारी दोन यंत्र आणण्यात आली आहे. तसेच हे केंद्र चालविण्यासाठी तंत्रज्ञा, विशेष डॉक्टर (युरॉलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट) पूर्णवेळ उपलब्धच होत नाही आहे. तसेच इतर कर्मचाऱ्याऱ्यांचा देखील अभाव आहे. केंद्र सुरु होण्याआधी देखील विशेष डॉक्टरांअभावी हे केंद्र लवकर सुरु होत नव्हते. या केंद्रांच्या अनास्थेबाबत लोकसत्ता ठाणेमध्ये सातत्याने वृत्तांकनही करण्यात आले आहे. मात्र आद्यपही या केंद्राप्रति असलेली सरकारी अनास्था संपलेली नाही.
मुरबाडमध्ये मागील महिन्यात सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस केंद्राला मात्र रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत ५७ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले आहे. तर नव्याने १२ रुग्णांची नोंदणी करण्यात आले. या ठिकाणी सर्व तज्ज्ञ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामुळे मुरबाड मधील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र त्याच्या शेजारीच असलेल्या शहापूर तालुक्याच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय असल्याचे दिसून येत आहे.
शहापूरमधील डायलिसिस केंद्रात सर्व सुविधा आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या या ठिकाणी रुग्णांचा प्रतिसाद कमी आहे. मात्र रुग्णांना या केंद्राबाबत अवगत करून उपचार करणे आणि रुग्णसंख्या वाढविण्याचे काम सुरु आहे. – डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे