ठाणे : ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीमध्ये ‘नोटा’वर अर्थात ‘वरील पैकी कोणताही उमेदवार नको’ या पर्यायासाठी तब्बल ४७ हजार २४२ जणांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान शहापूरमध्ये झाले असून या ठिकाणी ४ हजार ८९२ इतके मतदान झाले आहे. विशेष म्हणजे, याच मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा आणि शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. अवघ्या १ हजार ६७२ मतांनी दरोडा निवडून आले. तर शहापूर प्रमाणेच, ठाण्यातील संमिश्र वस्ती असलेल्या ओवळा माजिवडा मतदारसंघात नोटाला ४ हजार १९३ इतके मतदान झाले.
ह
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यातील तब्बल १६ मतदारसंंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. ठाणे जिल्ह्यात ५६.५ टक्के इतके मतदान झाले असून २०१९ च्या तुलनेत मतटक्का काही प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात २४४ उमेदवार रिंगणात होते. काही मतदारसंघात २० हून अधिक उमेदवार निवडणूक लढवित होते. असे असतानाही नागरिकांनी अपक्ष किंवा एखाद्या संघटनेपेक्षाही ‘नोटा’ या पर्यायाला मतदान दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
शहापूर जिल्ह्यात यावर्षी ६८.३२ टक्के इतके मतदान झाले होते. याच मतदारसंघात नोटाला जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान झाले. शहापूर विधानसभेत नऊ उमेदवार निवडणूक लढवित होते. तर या मतदारसंघात नोटाला ४ हजार ८९२ इतके मतदान झाले. यापाठोपाठ ओवळा माजिवडा मतदारसंघातही ४ हजार १९३ इतके मतदान नोटाला झाले. या मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक लढवित होते, तर ५२.२५ टक्के मतदान या मतदारसंघात झाले होते. मुरबाड मतदारसंघात ९ उमेदवार निवडणूक लढवित होते. तर नोटाला ३ हजार ९५२ इतके मतदान झाले. मुरबाडमध्ये एकूण ६४.९२ इतके मतदान झाले होते. नोटा पर्यायाला सर्वात कमी मतदान भिवंडीत झाले. भिवंडी पूर्वमध्ये ७३८, भिवंडी पश्चिममध्ये १ हजार ७२ इतकेच मतदान झाले.
मतदारसंघ – नोटा
ठाणे – २६९४
कोपरी पाचपाखाडी- २६७६
ओवळा – माजिवडा – ४१९३
मुंब्रा-कळवा – २६७९
भिवंडी पूर्व – ७३८
भिवंडी पश्चिम – १०७२
भिवंडी ग्रामीण – २५७१
कल्याण पूर्व – १८७२
कल्याण पश्चिम – २७७४
कल्याण ग्रामीण – २७३४
डोंबिवली – २७४५
अंबरनाथ – २३१६
उल्हासनगर- १७५९
मुरबाड – ३९५२
शहापूर – ४८९२
मिरा भाईंदर – २२७९
बेलापूर – २५८८
ऐरोली – २७०८
एकूण – ४७२४२