शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ठाणे स्थानकावर लोकल ट्रेन थांबली आणि ज्या सराईतपणे बाहेरच्या प्रवाशांनी लोकलमध्ये ‘घुसखोरी’ केली, त्याच सराईतपणे आतल्या प्रवाशांनीही ‘हे तर नेहमीचंच’ अशा आविर्भावात त्या सगळ्या प्रक्रियेकडे पाहायला सुरुवात केली. पण या सगळ्यात त्यांना एक अनपेक्षित आश्चर्याचा धक्का बसला. कारण लोकलमध्ये नेहमीच्या गर्दीसोबतच थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवच डब्यात शिरल्याचं पाहून आतले प्रवासीही काही काळ भांबावून ते पाहात राहिले. काही क्षणांचा धक्का पचवल्यानंतर लोकलमधल्या प्रवाशांना नेमकं काय घडतंय, याचा साक्षात्कार झाला!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहाव्या मार्गिकेचं उद्घाटन!

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी आज ठाणे ते दिवा असा लोकल प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे देखील होते. ठाण्यापासून दिव्यापर्यंत त्यांनी प्रवास केला.

दोघांनी उभ्यानंच केला प्रवास

या प्रवासाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रावसाहेब दानवे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत लोकलच्या डब्यात चढल्यानंतर दोघांनी उभं राहूनच प्रवास केला. सुरुवातीला दानवेंनी अश्विनी वैष्णव यांना बसण्याची विनंती देखील केली, मात्र, वैष्णव यांनी उभ्यानंच प्रवास करण्याचा आग्रह केल्यानंतर दानवेंनीही त्यांच्या सोबतीने उभ्यानंच प्रवास केला. दिवा स्थानकावर उतरल्यानंतर अश्विनी वैष्णव आणि रावसाहेब दानवे यांनी स्थानकावरच्या प्रवाशांशी देखील काही काळ संवाद साधला.

सहाव्या मार्गिकेमुळे काय साध्य होणार? वाचा सविस्तर

…आणि अखेर सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं

ठाणे ते दिवा अवघ्या ९.४० किलोमीटर लांबीच्या या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेला सेवेत येण्यासाठी बारा वर्षाहून अधिक कालावधी लागला आहे. २००८ रोजी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला मंजुरी मिळालेली. मात्र अनेक ठिकाणच्या परवानग्या आणि उन्नत मार्गिकेमुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब लागला. मुंब्रा रेतीबंदर येथील खाडी किनारी उन्नत मार्ग तयार करण्याचं मोठं आव्हान रेल्वे समोर होतं. सुमारे ६२५ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प अखेर १२ वर्षानंतर पूर्ण करण्यात आलाय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane diva sixth lane local train track inauguration ashvini vaishnav video narendra modi pmw