ठाणे : ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षाकरीता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या सगळ्या विभागामध्ये आपले काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील ते वाढणार असल्याने येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होते. या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचे दिसून येत असून येथील जनताही अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभी असल्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे, असे सूचक विधान उपख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाण्यात केले. तसेच अनेकांची अपेक्षा असली तरी निवडणुकीबाबत आज कोणतीही बातमी देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर ठाण्याच्या जागेवरून वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
ठाणे येथील रेमंड मैदान परिसरात भाजपने दुमजली प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटिल, आमदार संजय केळकर, गणेश नाईक, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे विभागात भाजपचे काम अतिशय सुंदरपणे सुरू आहे. याठिकाणी मित्रपक्ष देखील वारंवार आपल्यासोबत राहिलेले आहेत. परंतु भाजपचे काम याठिकाणी मजबुतीने वाढताना दिसून येत असून आजच्या घडीला ठाणे विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचे पहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते दिसत असून आपल्याला विविध निवडणुकांमध्ये चांगले यश मिळत आहे. कारण, ठाणे विभागातील जनताही अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षाकरीता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या सगळ्या विभागामध्ये आपले काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील ते वाढणार असल्याने येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक
आपण निवडणुकीला सामोरे जातो आहोत आणि इथे अनेकांच्या अपेक्षा आहे की एखादी हेडलाईन वगैरे मी द्यावी. परंतु माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असे करायचे नसते. यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाही, असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे. देशात चारशेचा आकडा पार करायचा असेल तर राज्यात ४० चा आकडा पार करावा लागेल. त्यामुळे पक्षासाठी एक-एक जागा महत्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी मेहनत करून या जागा निवडूण आणायच्या आहेत. मोदी यांची दहा वर्ष म्हणजे ट्रेलर होता, यामुळे चित्रपट अजून बाकी आहे. पुढील पाच वर्षे भारताची भविष्यातील दिशा ठरवणारे असणार आहेत. अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळते असून ही समाधानाची गोष्ट आहे. विरोधक निराश आहेत. त्यांना काय बोलावे कळत नाही. त्यामुळे देव त्यांना सुबुद्दी देवो, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रभू श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या विजयाची गुढी देशात आणि राज्यात उंच उभारा, असेही म्हणाले.
जनतेची गुंतवणूक करा
कोणत्याही दानातून हे कार्यालय उभारण्यात आलेले नसून त्याची वाजवी किंमत देण्यात आली आहे. इतर पक्षातील लोक स्वत:ची मालमत्ता करण्याचे काम करतात पण, भाजपचे लोक पक्षाची मालमत्ता करण्याचे काम करतात. भाजपचे कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याची भावना असते. जेव्हा भाजप सत्तेत असते तेव्हा हे कार्यालय शासन, संघटन आणि जनता यांच्या मधल्या सेतूचे काम करते आणि ज्यावेळी आपण विरोधी पक्षात असतो त्यावेळी हेच कार्यालय जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्ष उभा करण्याचे काम करते. या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता यांना एक आपुलकीची वागणूक मिळेल. कार्पोरेट कार्यालय बांधून आपल्याला व्यवसाय करायचा नाही. आपल्या व्यवसायात एकच गुंतवणूक आहे. ते म्हणजेच जनतेचे प्रेम. जनतेचे आशीर्वाद मिळवण्याकरता जेवढी अधिकाधिक गुंतवणूक आपल्याला करता येईल, तीतकी गुंतवणुक आपल्याला निश्चितपणे करायची आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.