ठाणे : दर्जेदार विषय असलेल्या एकांकिका, त्याला असलेली उत्तम अभिनयाची जोड आणि प्रेक्षकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिके’ची ठाणे विभागीय अंतिम फेरी पार पडली. प्राथमिक फेरीतून बाजी मारलेल्या पाच एकांकिकांनी उपस्थित प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकली. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये गुरुवारी प्रेक्षकांच्या मोठय़ा उपस्थितीत ही फेरी पार पडली.

या एकांकिका पाहण्यासाठी आणि दर्जेदार अभिनय अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली. विभागीय अंतिम फेरीची सुरुवात न्यू पनवेल येथील सी. के. ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तुंबई’ या एकांकिकेने झाली. ‘‘झाली झाली हो झाली आमच्या मुंबईची तुंबई झाली’’ गाणं म्हणत विद्यार्थ्यांनी एकांकिकेची सुरुवात केली. तर, मुंबईतील वाढणारी गर्दी मुंबईच्या कशी मुळावर उठली आहे यावर भाष्य करत विद्यार्थ्यांनी मुंबई आणि उपनगरामध्ये राहणाऱ्या सर्व सामान्य माणसांची कथा मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला. एका सामान्य माणसाने मुंबईवर दाखल केलेली केस आणि त्याचे केस करण्याचे प्रयोजन विद्यार्थ्यांनी उलगडून सांगितले.

 रोजचे जगणे मांडणाऱ्या या एकांकिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. यानंतर कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाने सादर केलेल्या फॅमजॅम या एकत्र कुटुंबावर भाष्य करणाऱ्या एकांकिकेने प्रेक्षकांच्या भावनांना हात घातला.  संपत्तीच्या हव्यासामुळे एकत्र राहणारे कुटुंब आणि संपत्ती मिळविण्यासाठी कुटुंबीयांनी खेळलेला बिगबॉस नामक खेळ असे धमाल प्रहसन या एकांकिकेतून सादर केले. 

Story img Loader