भगवान मंडलिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना महासाथीमुळे मागील दोन वर्षात घर खरेदी रोडावल्याने त्याचा परिणाम दस्त नोंदणीवर झाला होता. मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून शासनाला मिळणाऱ्या महसुलात घट झाली होती. ती भर यावेळी ठाणे जिल्ह्याने भरुन काढली आहे. ठाणे जिल्ह्याला मुद्रांक शुल्क वसुलीचे चालू आर्थिक वर्षात सात हजार ५०० कोटीचे लक्ष्य देण्यात आले होते. हा लक्ष्यांक पार करुन मुद्रांक विभागाने मार्चच्या मध्यापर्यंत सात हजार ६८० कोटीच्या दिशेने झेप घेतली होती. मार्च अखेरपर्यंत हा आकडा वाढेल, असे मुद्रांक शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.जिल्ह्यात सर्वाधिक दस्त नोंदणी यावेळी ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, भिवंडी, शहापूर जवळील खर्डी, वासिंद ग्रामीण भागात झाली आहे. मार्चच्या अखेरच्या दिवशी मुद्रांक शुल्क वसुलीचा आकडा लक्ष्यांकापेक्षा वाढलेला असेल. ही विक्रमी वसुली मागील दोन वर्षानंतर प्रथमच झाली आहे, असे अधिकारी म्हणाला. सर्वाधिक महसुल मिळून देणारा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा विभाग म्हणून मुद्रांक शुल्क विभाग ओळखला जातो.

हेही वाचा >>>ठाण्यातील खारटन भागात रस्ता खचला, रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे करण्यात आली बंद

गेल्या दोन वर्षाच्या काळात करोना महासाथीने सर्वांची आर्थिक घडी विस्कटली. त्याचा परिणाम महसुली उतन्न्नावर झाला होता. आता विक्रमी महसुली वसुली होऊन जिल्ह्याची विस्कटलेली घडी बसविण्यास या वसुलीने हातभार लावला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी भागांचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. मोठे गृहप्रकल्प, नागरी वसाहती या भागात उभारल्या जात आहेत. ग्रामीण भागातील बहुतांशी नोकरदार वर्ग मुलांची शिक्षणे, नोकरीच्या निमित्ताने शहरी भागाकडे कुटुंबासह निवासासाठी येत आहे. शहरी वातावरणात घुसमटलेला एक वर्ग आपले दुसरे घर म्हणून या नव्याने विकसित होत असलेल्या भागात घर घेत आहे. नोकरदारांचे वाढलेले वेतन आणि बँकांकडून मिळणारी झटपट कर्ज यामुळे घर खरेदीकडे नागरिकांचा ओढा आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.राज्यात संपणाऱ्या आर्थिक वर्षात २२ लाख ७० हजार दस्त नोंदणीचे व्यवहार झाले आहेत. या माध्यमातून महसूल विभागाला ३४ कोटीहून अधिकचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. मार्च अखेरपर्यंत या महसुलात आणखी वाढ होईल, असे महसुल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“ठाणे जिल्ह्याला दिलेल्या लक्ष्यांकापेक्षा संपणाऱ्या आर्थिक वर्षात अधिकचा महसूल मिळाला आहे. या महसुलात मार्च अखेरपर्यंत आणखी वाढ होईल. मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढल्याने महसुली उत्पन्न वाढले आहे.”-श्रावण हर्डीकर,नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane dombivli kalyan bhiwandi rural have the highest enrollment amy