अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आणि बारवी गुरूत्व वाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम गुरूवारी मध्यरात्रीपासून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे गुरूवार रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांकरिता पाणी पुरवठा बंद केले जाणार आहे. या दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीसह औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा बंद राहिल. त्यामुळे जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणी पुरवठा केला जातो. नागरी वसाहतींना पाणी देत असताना औद्योगिक वसाहतींनाही बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणातून सोडले जाणारे पाणी गुरूत्वाकर्षणाने उल्हास नदीला येऊन मिळते. उल्हास नदीवर आपटी येथील बंधाऱ्याजवळून हे पाणी उचलून अंबरनाथ शहराजवळच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. येथील तीन मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून हे पाणी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या शहरी वसाहतींना तसेच डोंबिवली, तळोजा, अंबरनाथ, बदलापूर या औद्योगिक वसाहतींनाही पाणी पुरवले जाते.

या जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिन्यांवर देखभाल आणि दुरूस्तीचे काम हाती घेतले जाते आहे. गुरूवार रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत हे काम होईल. या २४ तासांच्या काळात पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरी वसाहती आणि औद्योगिक वसाहतींना होणारा पाणी पुरवठा ठप्प असेल. त्याचा परिणाम शनिवारीही काही अंशी जाणवू शकतो. त्यामुळे या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader