कल्याण : मकरसंक्रातीनिमित्त बाजारात पतंग आणि मांजा विक्रीची झुंबड आहे. शासनाने हा आनंद घेत असताना नायलाॅन मांजा, चिनी, प्लास्टिक कृत्रिम मांजा यांचा वापर पतंग उडविण्यासाठी करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही काही दुकानदार चोरून लपून अशाप्रकारचे प्रतिबंधित घातक मांजा वापरत असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिसांनी पतंग, मांजा विक्रीच्या दुकानांमध्ये छापे टाकून सहा दुकानदारांवर चीनी, नायलाॅज मांजा विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
चिनी, घातक, प्लास्टिक, नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या कोळसेवाडी, विष्णुनगर, बाजारपेठ, महात्मा फुले या पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक आणि कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
हेही वाचा…अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने चिनी, नायलाॅन मांजा वापरावर शासनाची बंदी आहे. त्यामुळे पालिका हद्दीत या प्रतिबंधित मांजाची विक्री करण्याचा प्रयत्न दुकानदारांनी करू नये. दुकानात लपूनछपून प्रतिबंधित चिनी, नायलाॅन मांजा विक्रीचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांच्यावर पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी कल्याण, डोंबिवली शहर परिसरात उत्सवी नागरिक, तरूण, तरुणींकडून अधिक प्रमाणात पतंग उडविली जाण्याची शक्यता असल्याने पोलीस आणि पालिकेनेही त्यादृष्टीने काळजी घेतली आहे.
हेही वाचा…डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक
पतंंगोत्सवाचा आनंद घेत असताना घातक चिनी, प्लास्टिक, नायलाॅन मांजाचा वापर कोणी करू नये यादृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण, डोंंबिवलीतील स्थानिक पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील पतंग, मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर छापे टाकून त्या दुकानांमध्ये प्रतिबंधित नायलाॅन मांजा विक्री केली जात नाही ना याची विशेष काळजी घेतली जात आहे. यापूर्वी हे घातक मांजा झाडांमध्ये अडकून त्याचा फास पक्ष्यांच्या मान, पायाला लागून पक्षी घायाळ, मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी मांजा दुचाकी स्वारांच्या गळ्याला लागून त्यांना गंभीर दुखापती झाल्याचे प्रकार घडले आहेत.
हेही वाचा…पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
प्रतिबंधित चिनी, नायलाॅन, प्लास्टिक मांजा या घातक मांजाचा वापर करून कोणीही पतंग उडविण्याचा आनंंद घेऊ नये. या मांजांमुळे झाडावरील पक्षी, दुचाकी स्वार यांना गंभीर दुखापती होतात. गंभीर दुर्घटना यामुळे होण्याची शक्यता विचारात घेऊन वरिष्ठांच्या आदेशावरून घातक प्रतिबंधित मांजा विक्री करणाऱ्या, साठा करणाऱ्या, वापरकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशोक कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी पोलीस ठाणे.