ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी जंक्शन परिसरात एका भरधाव मर्सिडीज मोटारीच्या धडकेत दर्शन हेगडे (२१) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अभिजीत नायर (२७) याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत याला अद्यापही पोलिसांना अटक करणे शक्य झाले नाही. परंतु त्याची मोटार महापालिकेच्या एका वाहनतळामध्ये आढळून आली आहे. ही मर्सिडीज मोटार २००८ मधील असून अभिजीत याने ती सेकंड हँड पद्धतीने अवघ्या पावणे चार लाख रुपयांत घेतल्याचे उघड झाले आहे. तसेच अभिजीत याची कौटुंबिक स्थिती देखील साधारण आहे. आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही अभिजीत याची मर्सिडीज चालविण्याची हौस दर्शन याच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.

वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालय परिसरात राहणाऱ्या दर्शन हेगडे हा दुचाकीने सोमवारी मध्यरात्री खाद्य पदार्थ आणण्यासाठी गेला होता. तो नितीन कंपनी चौकात आला असता, ठाण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव मर्सिडीज मोटारीने धडक दिली. या धडकेनंतर दर्शन रक्ताच्या थारोळ्या पडला असताना चालकाने मोटारीसह तेथून पळ काढला. दर्शन याच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दर्शन याच्या मृत्यूनंतर हा अपघात कोणी केला याचा शोध नौपाडा पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तसेच वाहन क्रमांकावरून पोलिसांनी अभिजीत नायर याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली. अभिजीत हा मुलुंडचा रहिवासी असून त्याने ही मोटार अवघ्या पावणे चार लाख रुपयांना विकत घेतल्याचे समोर आले आहे. अभिजीत याने बी.एससी. मध्ये महाविद्ययालयीन शिक्षण अर्धवट सोडून दिले होते. एका कागद कंपनीमध्ये तो काम करत होता. तेथे त्याला जेमतेम वेतन होते. तसेच त्याचे वडील देखील एका ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. मर्सिडीज मोटार पोलिसांना मुंबई महापालिकेच्या एका वाहन तळामध्ये आढळून आली आहे. ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : शिवसेनेचे वामन म्हात्रे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, शिवसेनेत दुसऱ्या बंडखोरीचे संकेत, २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार

त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोटारीमध्ये अभिजीत नायर हा वाहन चालवित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.