ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शहरभर मोठे बॅनरबाजी करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरवर ‘आमच दैवत’, डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू काॅमन मॅन असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शिंदे यांच्या वाढदिवसानिमितातने शहरभर बॅनरबाजी अन् कार्यक्रमांची जंत्री दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. ४ फेब्रुवारी रोजी त्यांचे पुत्र व खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता. या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावले आहेेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर नाका ते माजिवाडा नाक्यापर्यंतच्या रस्ता आणि उड्डाणपुलावरील विद्युत खांब तसेच घोडबंदर मार्गावरील विद्युत खांब याठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, बस थांबे अशा सर्वच ठिकाणी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक झळकताना दिसन येत आहेत. या बॅनरवर ‘आमच दैवत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे नेहमी भाषणात डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू काॅमन मॅन असा उल्लेख करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही फलकांवर त्यांचा असाच उल्लेख केल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाढदिवसानिमित्ताने शहरभर करण्यात आलेल्या बॅनरबाजीबरोबरच शहरात आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक १४ मध्ये आजूबाजूच्या स्लम परिसरातील नागरिकांसाठी शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, मा. नगरसेवक दिलीप बारटक्के आयोजित गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका शाळा क्रमांक १२० मैदान, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, ठाणे येथे ‘आरोग्य महायज्ञ २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. अशाचप्रकारे शहराच्या इतर भागातही आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आनंदोत्सव तीन दिवस साजरा केला जाणार असून यात अनाथांचा नाथ’ या ध्वनिचित्रफितीचे पुन: प्रकाशन आणि ‘एकनाथ-लोकनाथ’ या ध्वनिचित्रफितीच्या प्रकाशनाने होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane eknath shindes birthday supporters waved banners across city to wish him sud 02