ठाण्याच्या निवडणुकीत ‘नॉन मॅट्रिक’ उमेदवारांची नांदी

सुसंस्कृत, सुशिक्षितांचे शहर अशी ओळख मिरवणाऱ्या ठाणे शहराच्या महापालिका निवडणुकीत मतदारांवर छाप पाडण्यासाठी एकीकडे चाणाक्ष उमेदवार मुक्त विद्यापीठांच्या पदव्या मिळवून ‘पावन’ होत असतानाच, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी ४० टक्के उमेदवार शालांत परीक्षांचा टप्पाही ओलांडू शकले नसल्याचे दिसून येत आहे. मतदारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जेमतेम माध्यमिक शिक्षणापुरतीच मर्यादित असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ८०५ उमेदवार आहेत. या उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरताना नोंदवलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशिलानुसार ४० टक्क्यांहून अधिक उमेदवार अल्पशिक्षित आहेत. बहुतांश उमेदवारांचे शिक्षण तर जेमतेम पाचवीपर्यंत झाले असून काहींनी नववी इयत्तेपर्यंत मजल मारली आहे.

ठाणे शहरात तळागाळात रुजलेली संघटना म्हणून शिवसेनेचा उल्लेख होत असतो. शाखाशाखांमधून या पक्षाची बांधणी असल्याने वागळे इस्टेट, वर्तकनगर, मूळ शहर आणि कळव्यात या पक्षाची मजबूत पकड आहे. असे असले तरी या पक्षाने रिंगणात उतरविलेल्या बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जेमतेम दहावी इयत्तेपर्यंत मर्यादित असल्याचे दिसून येते. शिवसेनेने रिंगणात उतरविलेल्या ११९ उमेदवारांपैकी २९ उमेदवारांना जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले आहे. भाजपचे ३२ उमेदवार दहावीपर्यंत पोहचू शकले       सून या पक्षाच्या इंदिरानगर भागातील केवलादेवी यादव या उमेदवार तर अशिक्षित आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जेमतेम असून मनसेने रिंगणात उतरविलेले बरेच उमेदवार मात्र १२वी तसेच पदवीपर्यंत शिक्षित आहेत. एकीकडे अल्पशिक्षित उमेदवारांची भली मोठी रांग दिसत असताना एमबीए, वकील झालेले काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उच्चशिक्षित उमेदवार यादीत आहेत.

 

Story img Loader