क्रीडा विभागावर सर्वाधिक खर्च करणारी पालिका असूनही दादोजी कोंडदेव येथे सोयीसुविधांनी भरलेला सिंथेटिक अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक तयार झालेला नाही. यावर अनेकदा अ‍ॅथलेटिकसंघटनेबरोबर चर्चा झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडू महापालिकेच्या कारभाराविषयी नाराज आहेत.

मुंब्रा येथे तयार करण्यात आलेल्या अ‍ॅथलेॅटीक ट्रॅक्सवर लांब उडीसारखे खेळ खेळता येत नाहीत. येथे वाळू तसेच रनवे ट्रॅक बनविला नसल्याने खेळांडूची गैरसोय अधिक होताना दिसते. त्यामुळे मुळातच ठाणे जिल्ह्य़ामध्ये एकही चांगल्या दर्जाचा सिंथेटीक ट्रॅक नसल्यामुळे खेळाडूंना खेळाचा सराव मातीमध्ये करावा लागतो. मात्र राज्य किंवा आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटीक स्पर्धेत खेळताना सिंथेंटीक ट्रॅकवरच खेळावे लागते. त्यामुळे एरवी मातीत खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सिंथेटीक ट्रॅकवर खेळावे लागत असल्याने ते बावचळतात. त्यातील काही खेळाडूंना सराव करण्यासाठी मुंबई येथील प्रियदर्शनी येथील मैदानात जावे लागते. ठाणे जिल्ह्य़ातून साधरणात: हजारएक खेळाडू अ‍ॅथलेटीक्स खेळतात. त्यातील निधीसिंगसारखे अनेक खेळाडू राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिके मिळवून ठाणे जिल्ह्य़ाचा लौकिक वाढवितात. अ‍ॅथलेटीक संघटनेचे अध्यक्षपद सध्या पालकमंत्री एकनाथ शिंदे भुषवत असून लवकरात लवकर खेळांडूसाठी ट्रॅक बनवू देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र तो ट्रॅक अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. बॅटमिंटन तसेच शुटींग रेंजसाठी महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांना जागा देऊ केल्याने त्याचे पैसे भरणे अनेक चांगल्या खेळाडूंना शक्य नसल्याने त्यांना प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.

अ‍ॅथलेटीक सिंथेटीक ट्रॅकवरील खेळ

अ‍ॅथलेटिक्स खेळामध्ये ५ हजार मीटर धावण्यासाठी धावपट्टी आवश्यक. १०० मीटर अडथळा शर्यत धावपट्टी आवश्यक. तीन हजार मिटर स्टीपल चेस, लांब उडी, उंच उडी, बांबु उडी, गोळाफेक, थाळी फेक, भाला फेक, हातोडा फेक, रीले आदी खेळासाठी मैदान आवश्यक

नाव शोभेपुरतेच

दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे संपूर्ण ट्रॅक उभारण्याची ग्वाही अ‍ॅथलेटीक खेळाडू संघटनेला देण्यात आली होती. मात्र अद्याप इथे फक्त १२० मीटर लांबीचा  सिंथेटीक ट्रॅकचा छोटासा पट्टा तयार करण्यात आला. या ट्रॅकवर खेळाडूंना खेळणेही अशक्य आहे. मुंब्रा येथे उभारण्यात आलेल्या ट्रॅकवर वाळू , रनवे सरफेस, सिंथेटीक  ट्रॅक नाही. त्यामुळे या साध्या ट्रॅकचा खेळाडूंना काहीही उपयोग नाही. संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ात एकही सिंथेटीक ट्रॅक नसल्याची खंत प्रशिक्षक निलेश पातकर, सुशील इनामदार आणि खेळाडू निधी सिंग यांनी व्यक्त केली आहे.

पक्षांचे आजवरचे वचननामे

शिवसेना

‘खेळाचे ठाणे खेळाडूंचे ठाणे आता बनवूया स्मार्ट ठाणे’ असे फलक संपूर्ण ठाणे शहरात  लावलेले दिसत आहेत. मात्र ठाणे शहरासाठी सुसज्ज मैदान नाही. याआधीही दादोजी कोंडदेव स्टेडियमवर अनेक खेळांसाठी मैदान तयार करू तसेच सिंथेटीक ट्रॅक तयार करण्याची घोषणा केली होती.

भाजप

ठाण्यामध्ये फुटबॉल  हॉकी स्टेडीयमची निर्मिती करणार. खो- खो कबड्डी व कुस्तीसाठी विशेष क्रीडा संकुलाची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली आहे. जिमनॅस्टिकसाठी दर्जेदार संकुल उभारणार असून राष्ट्रीय व राज्यस्तरारील नावाजलेल्या खेळांडूसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणार असल्याची घोषणा सध्या भाजपच्या वचननामामध्ये करण्यात आली आहे.

मनसे

शाळांमधून खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली आहे. दरम्यान युतीने गेल्यावेळी खेळाडूंना दिलेले कुठलेही वचन पूर्ण केलेले नाही. सगळीच कामे अर्धवट केली आहेत.

पूर्ण सिंथेटीक ट्रॅक उभारण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम सध्या रखडले आहे.

मीनल पालांडे , क्रीडा अधिकारी महानगरपालिका

संकलन- भाग्यश्री प्रधान

Story img Loader