ठाणे : रिकाम्या बाटल्यामध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य भरून त्याची विक्री करणाऱ्या पाचजणांना ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून ६१ लाख ४६ हजारांचा मद्यसाठा पथकाने जप्त केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार फरार असून पथके त्याचा शोध घेत आहेत. तसेच या टोळीने रिकाम्या बाटल्यांमध्ये भरण्यासाठी भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणले कुठून याचाही तपास पथके करीत आहेत.

रामकेश सिताराम गुप्ता, राहुल ज्ञानेश्वर काटे, गणेश प्रकाश बांद्रे, पप्पु देवनाथ गुप्ता, नितेश बाळाराम म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्या पाचजणांची नावे आहेत. तर, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार राकेश बाळाराम म्हात्रे हा फरार झाला आहे. त्याचा राज्य उत्पादन शुक्ल विभागाची पथके शोध घेत आहेत.

मिरारोड पुर्व भागातील पेणकरपाडा भागातील एका हाॅटेलच्या गल्लीत बेकायदेशीरपणे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रविण तांबे यांच्या पथकाने १ एप्रिल रोजी या भागात धाड टाकून रामकेश सिताराम गुप्ता याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील १ लाख २५ हजार ४७० रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.

पथकाने त्याची कसून चौकशी केली असता, त्याने मद्य साठा पुरविणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली. एक व्यक्ती आठवड्यातून एक वेळेस मद्य पुरवठा करतो आणि तो ४ एप्रिल रोजी पुन्हा मद्य साठा पुरविण्यासाठी येणार आहे, अशी माहिती रामकेश याने चौकशीदरम्यान दिली. त्याआधारे पथकाने मिरारोड पुर्व भागात सापळा रचला होता. त्यावेळेस एका टेम्पोमधील दोन जण रामकेश याला मद्यसाठा देत असतानाच, पथकाने मद्यसाठा पुरविणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.

त्यावेळी कल्याण-भिवंडी रोडवरील जांभूळवाडी येथे राहणारे मालक राकेश बाळाराम म्हात्रे यांनी त्यांच्या राहत्या घरातून हा साठा दिल्याची माहिती दोघांनी चौकशीत दिली. यानंतर पथकाने त्याठिकाणी धाड टाकली असता, तिथे नितेश बाळाराम म्हात्रे हे वाहनामध्ये भारतीय बनावटीच्या मद्याचा साठा ठेवताना आढळून आले. त्याला पथकाने ताब्यात घेतले असता, त्याने घराच्या पाठीमागे असलेल्या खोलीत रिकाम्या बाटल्यामध्ये भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा भरून त्या बाटल्यांचे बूच यंत्राच्या साहाय्याने लावतो, अशी माहिती पथकाला दिली. पथकाने येथे छापा टाकून ६१ लाख ४६ हजार ५५० रुपये किंमतीचा भारतीय बनावटीच्या मद्याचा साठा जप्त केला आहे, अशी माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.