ठाणे : मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागला असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक गृहसंकुलांबाहेरील पिपांमध्ये कचरा ढिग लागत आहेत. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या कचरा समस्येमुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. पालिकेच्या कचराभुमीमध्ये कचरा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप माजी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. तर, पावसाळ्यात कचरा प्रकल्पातील यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड, कचरा वाहतूक वाहने बंद पडणे आणि वाहतूक कोंडीमुळे कचरा वाहतूक फेऱ्या कमी होणे, या कारणास्तव घनकचरा नियोजनाचे चक्र बिघडल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात कचरा समस्या निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी पालिकेने डायघर येथे घनकचरा प्रकल्पाची उभारणी केली आहे. परंतु हा प्रकल्प अद्याप पुर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. तसेच वागळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरात पालिकेने घनकचरा हस्तांतरण स्थानकाची उभारणी केलेली आहे. असे असतानाही गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरासह घोडबंदर भागातील गृहसंकुलांबाहेरील पिंपामध्ये कचरा ढिग साचत आहेत. घोडबंदर रोडवरील ब्रह्रांड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत भागात दररोज सकाळी कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्या बंद झाल्या आहेत. परिणामी प्रत्येक संकुलाच्या बाहेर पिंपामध्ये कचरा साचला आहे. त्यातील कचरा रस्त्यावर पसरत आहे. पावसामुळे ओला कचरा कुजून दुर्गंधीबरोबरच रोगराई पसरण्याची भिती आहे. असेच काहीसे चित्र शहरातही आहे. या संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केली होती.

हेही वाचा…विश्लेषण : नवे ठाणे रेल्वे स्थानक महत्त्वाचे का? ते कधी कार्यान्वित होणार?

ठाणे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यु, मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. पावसाळ्यात संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी शहरात स्वच्छता गरजेची आहे. परंतु अनेक गृहसंकुलांबाहेरील पिपांमध्ये कचरा ढिग लागत आहेत. हा कचरा पावसामुळे कूजुन रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे.

माजी लोकप्रतिनिधींचा आरोप

डायघर कचराभुमी प्रकल्प आणि सीपी तलाव येथील घनकचरा हस्तांतरण केंद्रामध्ये कचरा साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेने भिवंडीत पर्यायी जागा शोधली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु पालिका दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करत असली तरी हे प्रकल्प कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजवणी होत नसल्यामुळेच ही समस्या निर्माण होत आहे, असा आरोप माजी नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी केला. तर, शहरात कचरा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असून पालिकेने शहरात ठिकठिकाणी कचरा प्रकल्प उभारून तिथेच कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली पाहीजे. घोडबंदर येथील हिरानंदानी भागातील घनकचरा प्रकल्पाची क्षमता वाढविली तर या भागातील कचरा समस्या काही प्रमाणात कमी होईल, असे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी सांगितले.

हेही वाचा…टिटवाळ्यातील तीन भाविकांचा अपघातात मृत्यू; इगतपुरीमधील घोटीसिन्नर रस्त्यावर दुर्घटना

पावसाळ्यात काही वेळेस कचरा प्रकल्पातील यंत्रणेत बिघाड निर्माण होतो. कचरा वाहतूक करणारी वाहने बंद पडतात आणि त्याचा कचरा वाहतूकीवर परिणाम होतो. शिवाय, वाहतूक कोंडीमुळे कचरा वाहतूक फेऱ्यांवरही परिणाम होतो. यामुळेच घनकचरा नियोजनाचे चक्र बिघडले असून ते लवकर सुरळीत होईल. – तुषार पवार, उपायुक्त, ठाणे महापालिका

हेही वाचा…डोंबिवलीत इमारतीच्या कठड्यावरून पडून महिलेचा मृत्यू

ठाण्यात कचरा साचण्याची वेगवेगळी कारणे असून त्यामध्ये वाहन तसेच प्रकल्प बंद पडणे अशा कारणांचा समावेश आहे. तसेच डायघर येथील घनकचरा प्रकल्पात विल्हेवाटीसाठी येणारा कचरा साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. तसेच भविष्यातील कचरा समस्या लक्षात घेऊन भिवंडीत जागेचा शोध घेतला आहे. – प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane faces garbage crisis due to collection disruptions and insufficient landfill space psg
Show comments