ठाणे : गेल्या काही दिवसांपासून खड्डे, वाहने बंद पडत असल्याने दररोज वाहतुक कोंडीला ठाणेकरांना समोरे जावे लागत आहे. मंगळवारी देखील हीच परिस्थिती आहे. मंगळवारी सकाळी कापूरबावडी उड्डाणपूलावर वाहन बंद पडल्याने कापूरबावडी ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. तर सोमवारी रात्रीपासून खारेगाव टोलनाका भागात खड्डे भरण्याच्या कामांमुळे येथील अवजड वाहनांच्या रांगा मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील मुंब्रा देवी मंदिरापर्यंत लागल्या आहेत. शहरातील इतर रस्त्यांवर देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे ठाणेकर कोंडीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे.
घोडबंदर येथून कापूरबावडीच्या दिशेने क्रेन जात होते. हे क्रेन कापूरबावडी उड्डाणपूलावर आले असता, अचानक बंद पडले. त्यामुळे सकाळी कापूरबावडी ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. काही वाहन चालकांनी ढोकाळी, आर-मॉल, मनोरमानगर येथील अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या मार्गांवरही वाहनांचा भार वाढून कोंडी झाली आहे.
तर मुंबई नाशिक महामार्गावर नारपोली वाहतुक पोलिसांच्या हद्दीत खड्डे बुजविण्याचे काम सुरू सोमवारी रात्री सुरू होते. या कामांमुळे खारेगाव टोलनाका ते मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे डोंबिवली, नवी मुंबई, शिळफाटा येथून ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत.