tv17जानेवारीच्या शेवटच्या अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात निसर्गाच्या रंगपंचमीची चाहूल लागते, पानगळ थांबून चैत्राची पालवी आणि वसंत ऋतू खुणावू लागतो, सारी सृष्टी या आनंद सोहळ्यासाठी सज्ज होऊ लागते, यापरीस माणूस काय वेगळा आहे? तो तर उत्सवप्रियच, आनंद व्यक्त करण्याच्या त्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात एवढेच. आपल्या इष्टदेवतेला गाऱ्हाणे घालून तिला अनुकूल करून घेण्यासाठी या दिवसाची तो वाटच पाहात असतो. आणि मग रंगपंचमीला अबीर, गुलाल, हळद, बुक्का मिसळत सुरू होतात गावोगावी उत्सव-जत्रांचे कल्लोळ.
जत्रा म्हटली की ठाणे जिल्ह्य़ातील सुप्रसिद्ध म्हसाची जत्रा चटकन डोळ्यासमोर उभी राहते, यंदा ही जत्रा ५ जानेवारी २०१५, शाकंभरी पौर्णिमा, पौष शके १९३६, सोमवार या दिवशी येते. म्हसाची जत्रा या दिवसापासून पुढे सात दिवस चालते. माळरानावर सुमारे दीड ते दोन कि.मी.च्या परिसरात भरणाऱ्या या भव्य यात्रेचे आकर्षण पुणे आणि मुंबईकरांनासुद्धा आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील खेडुतांच्या श्रद्धा, अंधश्रद्धांच्या भावबंधावरील सीमारेषा सांभाळीत गेली कित्येक शतके पारंपरिक पद्धतीने आजतागायत चालत आलेल्या या म्हसा यात्रेचे वैशिष्टय़ म्हणजे ऐतिहासिक काळात खुष्कीच्या मार्गाने अपरांत (कोकणप्रांत) ते घाटवाटेने देशावर जाण्यासाठी जे मार्ग होते, त्यापैकी सातवाहन काळातील नाणेघाट हा एक प्रमुख राजमार्ग येथून जवळच असून, त्या काळच्या मर्यादित दळणवळणाच्या साधनात बैलांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असे. त्यामुळे म्हसा गावात बैल खरेदी-विक्रीचे अथवा घाट चढून जाणाऱ्या नव्या दमाच्या बैलांच्या अदलाबदलीचे व्यवहार होत, आजही यात्रेनिमित्त जुन्नरपासून ते मुरबाडच्या पंचक्रोशीतील खेडूत, शेतकरी बैल खरेदी-विक्रीसाठी म्हसा यात्रेत सामील होतात. म्हसोबाच्या मंदिरात नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी भक्तगणांची दाटी होते. नवस फेडणाऱ्या भक्तगणांत एक अघोरी प्रकार येथे पाहावयास मिळतो. तो म्हणजे आपल्या पाठीत लोखंडी हुक खुपसून स्वत:ला लटकवून घेणारे काही भक्त येथे दिसतात. बैलांच्या शर्यती, चवली पावलीचे आणि नामवंतांचे तमाशाचे फड, हे यात्रेचे आणखी एक आकर्षण आहे. येथे येणारे यात्रेकरू शिधा बरोबर घेऊन येतात. शाकंभरी पौर्णिमेच्या चांद्रप्रकाशात अन्न शिजवले की त्यात औषधी गुण उतरतात असे म्हटले जाते.
डहाणूची महालक्ष्मी वा पालघरची शीतलादेवीची जत्रा, निर्मल गावची जत्रा, अशा चैत्र-वैशाखापर्यंत ठाणे जिल्ह्य़ातील प्रसिद्ध देवस्थानांत जत्रा भरतात. ठाणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातही शेकडो वर्षे ही प्रथा चालत आलेली आहे. या जत्रा ग्रामदेवतांच्या नावाने भरतात. ठाण्यातील ग्रामदेवता हा स्वतंत्र विषय आहे. शिलाहार काळात राज्य कारभार चालवणे सुकर व्हावे म्हणून विभाग पाडले होते. त्यांना पाडा किंवा पाखाड म्हणत. ठाण्यातील पाचपाखाडी म्हणजे आग्रा रोडच्या पश्चिमेला मामा-भाचा डोंगराच्या पायथ्यापर्यंत असणाऱ्या पाच गावांचा समूह, पाडा म्हणजे छोटेगाव जसे नौपाटक (नौपाडा), मनोहरपाडा (मनोरपाडा), नारोळीपाडा, टेंबीपाडा इत्यादी. या गावांच्या वेशीवर ग्रामदेवतांचे अधिष्ठान आहे. गावांचा रक्षणकर्ता किंवा रक्षणकर्ती म्हणून ही देवस्थाने स्थापण्यात आली. नौपाडय़ाची ग्रामदेवता आज समस्त ठाणेकरांची ग्रामदेवता वा गावदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. चेंदणी कोळीवाडय़ाची ‘एकवीरादेवी’, खोपटची ‘गावदेवी’, माजिवडय़ाची ‘चांगाईदेवी’, कोकणीपाडय़ाची ‘पालायदेवी’, मानपाडय़ाची ‘आदिमाया’, भाईंदरपाडय़ाची ‘पोषमात्रा’, वाघबीळची ‘माधवीदेवी वा महाईदेवी’, वडवलीची ‘चामुंडादेवी’, ओवळ्याची ‘सतीआई’, कोलशेतची ‘वाघजाई’, बाळकूमची ‘सोनुआई व मरीआई’ या देवदेवता गावाच्या रक्षणकर्त्यां म्हणून वेशीवर स्थानापन्न झालेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील या ग्रामदेवतांची पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा होत असते. काही गावांत प्रतिवर्षी उत्सव, जत्रा भरत असतात, त्यापैकी माजिवडय़ाची चांगाईदेवीची जत्रा प्रसिद्ध असून, दरवर्षी माघी-पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. ढोलताशांच्या गजरात देवीची पालखी निघते. घरासमोर अंगणात वा रस्त्यावर रांगोळी काढून सुवासिनी देवीच्या पालखीला सामोरे जाऊन देवीला ओवाळतात, गावांतून व वेशीवरून फिरत, वाजतगाजत पालखी देवळापाशी येते. दुसऱ्या दिवशी मानपानाचा दिवस असतो. गावातील प्रतिष्ठित लोकांचा त्यांच्या त्यांच्या इतमामाने यथोचित सत्कार होतो. देवीच्या मंदिरात चांगाईदेवीबरोबर भवानी, एकवीरा, सौंदालकरीण, जानकादेवी, कमलावती या देवींचीही साग्रसंगीत पूजाअर्चा होते. मग कोंबडा, बोकड देवीला अर्पण केला जातो. आता ही प्रथा कमी होत चालली आहे. भक्तगण आपापल्या रीतिरिवाजानुसार देवीला सागुतीचा नैवेद्य दाखवतात.
ठाणे हा आदिवासी जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. ठाणे महानगरपालिकेत समावेश झालेल्या गावपाडय़ांतून बहुसंख्य आदिवासी राहतात. आदिवासी संस्कृतीत माता किंवा शक्तीची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. वणीची ‘सप्तशृंगी’, डहाणूची ‘महालक्ष्मी’, माहुरची ‘रेणुका’, यवतमाळची ‘अंबा’, चंद्रपूरची ‘भवानी’, भिल्लांची ‘महाभोगी’ किंवा ‘मोगरादेवी’, महादेव कोळ्यांची ‘वरसूबाई’, इत्यादी आदिमायेची स्थाने आदिवासी भागातच असून, आदिवासी जमातीची ती आराध्यदैवते आहेत. ठाण्यातील ओवळा गावात येऊरच्या डोंगरालगत असलेल्या आदिवासी पाडय़ातील ‘चांमुडादेवी’, म्हणजे शक्तिदेवता महाकाली किंवा पार्वतीचे रूप आहे. वैशाखात म्हणजे साधारण एप्रिल-मेमध्ये चामुंडादेवीची यात्रा भरते. चामुंडादेवी मंदिराचे विश्वस्त मनोज ठाकूर सांगतात, की यावेळी देवीला बोकड किंवा कोंबडा देण्याची प्रथा आहे. आदिवासी गावकरी, सागुतीचा नैवेद्य चामुंडादेवीला दाखवून पूजा करतात. घर अंगण सारवून त्रिकोण, चौकोन, वर्तुळातील उभ्या-आडव्या रेषा काढून स्त्री-पुरुष, पशु-पक्षी, डोंगर, नदी, झाडे, पाने, फुले, चंद्र-सूर्य यातून सृष्टीदेवतेचे चित्र रेखाटले जाते. या चित्रातून आदिशक्ती चामुंडादेवी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.
भायंदरपाडय़ाचा पोषमात्रा हाही आदिवासींचा देव असून तिथेही जत्रा भरते. शिवाय, कोलशेतची वाघजाईची जत्रा, वाघबीळची माधाईची जत्रा, ढोकाळीच्या गावदेवीची जत्रा या सर्व जत्रा ठाण्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा ठेवा आहे, तो पाहण्यासाठी ठाण्यातील सर्व जाती-धर्माचे लोक मोठय़ा श्रद्धेने सामील होतात.
सदाशिव टेटविलकर