ठाणे : मासे खरेदी केली नाही म्हणून एकावर कोयता आणि चाकूने वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दिवा शहरात घडला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दिवा शहरात काही ठराविक व्यक्तींकडूनच खाद्य पदार्थ, साहित्य खरेदी करण्याची सक्ती नागरिकांवर केली जात असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी समोर आल्या होत्या. आता थेट हल्लाच झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दिवा येथील बेडेकरनगर परिसरात जखमी व्यक्तीचा चिकन आणि मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना चिकनसाठी लागणाऱ्या ब्राॅयलर कोंबड्या ते घाऊक दरातून दिव्यातील एका व्यक्तीकडून खरेदी करतात. तर दादर येथील घाऊक बाजारातून मासे विकत घेतात. त्यानंतर ते त्यांच्या दुकानामध्ये त्याची किरकोळ दराने विक्री करत असतात.

ब्राॅयलर कोंबड्या विक्री करणाऱ्या त्या तरुणाचा साथिदार घाऊक दरात मासे विक्री करत असतो. परंतु त्याच्याकडे महाग दरात मासे असल्याने जखमी व्यक्ती त्याच्याकडून मासे खरेदी करत नव्हता. दोघेही तरुण जखमी व्यक्तीस वांरवार त्यांच्याकडूनच मासे खरेदी करण्यास सांगत असे. परंतु जखमी व्यक्ती त्यांच्याकडून मासे खरेदी करत नव्हता. याचा राग त्या दोन तरुणांमध्ये होता.

दरम्यान, शुक्रवारी दोघेजण त्यांना मारहाण करणार असल्याची माहिती जखमीला मिळाली होती. सायंकाळी ते कुटुंबासोबत मासे स्वच्छ करत असताना जखमी व्यक्तीच्या दुकानात त्या तरुणांसह पाच जण तेथे आले. त्यांनी कोयता घेऊन त्यांनी विक्रेत्याच्या पायावर वार केला. त्यानंतर इतरांनी त्यांच्या डोक्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले. जखमीला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांनी याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.