ठाणे : मुंब्रा येथील जीवन बाग भागात रविवारी ३० वर्ष जुन्या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. उनेजा शेख असे मृत मुलीचे नाव असून तिचे आई-वडील आणि भाऊ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जीवन बाग येथे बानु टाॅवर ही तळ अधिक पाच मजली ३० वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीत एकूण २० सदनिका आणि सहा दुकाने आहेत. इमारतीमधील तळ मजल्यावरील एका सदनिकेत उनेजा ही तिचे वडील उमर शेख (२३), आई मुस्कान (२१) आणि भाऊ इजान (एक वर्ष) यांच्यासोबत राहात होती. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेतील स्वयंपाक घरातील छताचे प्लास्टर अचानक कोसळले. यात उनेजा ही गंभीर जखमी झाली. तर तिचे आई, वडील आणि भाऊ किरकोळ जखमी झाले.

हेही वाचा – डोंबिवलीजवळील निळजे गावात पिशवीत लघुशंका करून फळ विक्री

हेही वाचा – डोंबिवलीत तरुणाच्या अंगावर मोटार घालून फरफटत नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न

घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उनेजा हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. इमारत सी-२ बी (इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात येते. इमारतीमधील रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.