वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या चार जणांना ठाणे वन विभागाने अटक केली आहे. पथकाने त्यांच्याकडून १६ कासव आणि पाच जंगली पोपट जप्त केले आहे. हे सर्व प्राणी-पक्षी दुर्मीळ प्रजातीचे असल्याची माहिती वन विभागाने दिली. प्रमोद पाल, शाकीर खान, रशीद खान, दीपक म्हात्रे अशी आरोपींची नावे आहेत. ते प्राणी तस्करी करतात. बुधवारी ते मुंबईतील मालाड आणि क्रॉर्फड बाजार भागात दुर्मिळ प्राणी विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती ठाणे वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूए या संस्थेला मिळाली होती.
हेही वाचा >>> बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलमध्ये अंबरनाथकरांची घुसखोरी; अंबरनाथहून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांमुळे वाद वाढले
या माहितीच्या आधारे, ठाणे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, साहाय्यक वनरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांच्या पथकाने मालाड आणि क्रॉर्फड बाजारात सापळा रचला. त्यावेळी संस्थेचे रोहीत मोहिते आणि त्यांचे सहकारीही होती. या भागातून वन विभागाने प्रमोद, शाकीर, रशीद आणि दीपक या चारही जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे पाच जंगली पोपट आणि १६ कासव जप्त केले. याप्रकरणी प्रमोद, शाकीर, रशीद आणि दीपक म्हात्रे या चौघांना अटक करण्यात आली आहे.