ठाणे: घोडबंदरमधील गायमुख भागातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. मुंबई महानगरातील ही सर्वांत मोठी चौपाटी ठरणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. या प्रकल्पाची पाहणी शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली.
केंद्र आणि राज्य सरकार, ठाणे महापालिका, ठाणे स्मार्ट सिटी लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागला बंदर खाडीलगत चौपाटी विकसित केली जात आहे. स्मार्ट सिटी कामांच्या अंतर्गत येथे सुमारे ८०० मीटरची लांबी असलेल्या चौपाटीवर जेट्टी, गणेश विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट, खाडी लगत पादचाऱ्यांसाठी पदपथ, रस्त्यालगत पदपथ, मियावाकी उद्यान, आसनव्यवस्था, लघु प्रेक्षागृह, वाहनतळ, प्रसाधनगृहे, विद्युत रोषणाई आणि सीसीटीव्ही सुविधा करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा…‘रिलायन्स’कडील पाचही विमानतळ ताब्यात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्यामुळे ठाणेकरांना फेरफटका मारण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ही सगळ्यात मोठी चौपाटी ठरणार आहे. त्यानुसार, या चौपाटीचा विकास करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त राव यांनी सांगितले. त्याचबरोबर, नागला बंदर येथे आरमाराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून हा नागला बंदर सागरी किनारी विकास प्रकल्पाचा तिसरा टप्पा असेल. त्याचे भूमिपूजनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही आयुक्त राव यांनी दिली.
हे ही वाचा…सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला अश्लील चित्रीकरण दाखविल्याप्रकरणी शिक्षक अटकेत
नागला बंदर नाक्याजवळ होत असलेल्या सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या जागेची तसेच, कासारवडवली येथील विविध समाज भवनांच्या इमारतीची पाहणीही आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या विषयाचा पाठपुरावा मुख्यमंत्री करीत आहेत. हे सर्वधर्मीयांचे स्मृती वन असेल. त्यात काही कारणाने विलंब झाला असला तरी आता हे काम मार्गी लागेल, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. स्मशानभूमी ही सर्व धर्मियांसाठी असल्याने त्या सर्व समाज घटकांशी चर्चा करून त्यांच्या आवश्यकतेनुसार या स्मशानभूमीत बांधकामे आणि रचना केली जाणार आहे. माती, रेती, खडी, दिशा याबाबत आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ही स्मशानभूमी तयार करण्यात येईल. अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.