ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या बहुचर्चित जनता दरबाराला सोमवारी महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पहायला मिळाले. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात या प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत. देवेंद्र फडणीवस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्र आल्यानंतरही ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अजूनही बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे येथील प्रशासकीय, पोलीस यंत्रणेवर शिंदे यांचा दबदबा असल्याची चर्चा असतानाच नाईक यांच्या दरबारात यापैकी एकाही बड्या अधिकाऱ्याचे दर्शन झाले नाही.
एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मध्यंतरी नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली होती. याच कार्यक्रमात नाईक यांनी ठाण्यात फक्त कमळ ही केलेली घोषणाही चर्चेत आली होती. सोमवारी नाईक जुन्या ठाण्याचा भाग असलेल्या खारकर अळी भागातील रघुवंशी सभागृहात जनता दरबार भरविला. ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृह सध्या नुतनीकरणासाठी बंद आहे. त्यामुळे नाईक या जनता दरबारासाठी नव्या ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची निवड करतात का याविषयी उत्सुकता होती. मात्र जुन्या ठाण्यातच हा दरबार व्हावा असा आग्रह नाईक यांच्या समर्थकांनी त्यांच्याकडे धरला. त्यानुसार बाजारपेठेचा भाग असलेल्या भागाची निवड करण्यात आली. या जनता दरबारास मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र शहरातील शासकीय यंत्रणांमध्ये महत्वाची भूमीका बजाविणारे वरिष्ठ अधिकारी मात्र या दरबारस फिरकले नाहीत. त्यामुळे दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच या दरबाराचे सोपस्कार पार पाडावे लागले.
आयुक्त, जिल्हाधिकारी अनुपस्थितीत
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाणे महापालिकेत आयुक्तपदी सौरभ राव, पोलीस दलात आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली. याच काळात महापालिका, पोलीस, महसूल यंत्रणेत वरपासून खालपर्यत अधिकाऱ्यांची यंत्रणा शिंदे यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांची असल्याचे बोलले जाते. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, महापालिकेतील अतिरीक्त आयुक्त, उपायुक्त, महसूल विभागातील प्रभावी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही शिंदे यांच्या कार्यकाळातच झाल्या आहेत. नाईक यांनी दरबार भरविताना जिल्हाधिकारी यांच्या समवेत महापालिका आणि पोलीस आयुक्तांनाही उपस्थित रहाण्यासाठी निरोप धाडल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरलेल्या कार्यक्रमांचे कारण पुढे करत आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना नाईकांच्या दरबारात पाठविल्याचे सोमवारी दिसून आले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासंबंधीही अनेक तक्रारी या जनता दरबारात मांडल्या गेल्या. मात्र या यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारीही येथे उपस्थित नव्हते. या दरबारात जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभाव राखून असणारे काही तहसीलदार जातीने उपस्थित होते. मात्र तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना हे अधिकारी मख्ख चेहऱ्याने सामोरे जात असल्याचा सुरही व्यक्त झाला.
जोरदार प्रतिसाद आणि नाईकांचा वक्तशीरपणा
शिंदेच्या बालेकिल्ल्यात भरलेल्या या दरबारास ठाणेकर नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. भाजपचे स्थानिक जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी या दरबाराचे नियोजन व्यवस्थित होईल याची दक्षता घेतली. नाईक यांचे पुत्र संजीव नाईक हेदेखील याठिकाणी ठाण मांडून होते. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे हे काही काळ येथे उपस्थित होते. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या दरबाराबद्दल उत्सुकता आणि उत्साह दोन्ही दिसून आला. नाईकांच्या वक्तशीरपणाची चर्चाही येथे होते. ठाण्यात राजकीय नेते कार्यक्रमांना, सभांना वेळेवर येत नाही असा अनुभव आहे. नाईक मात्र ११ वाजता वेळेवर येथे आले आणि नागरिकांचा त्यांचा संवादही वेळेवर सुरु झाला.
या अधिकाऱ्यांची उपस्थिती..
ठाणे अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उमेद च्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, संदीप चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी महेंद्रकुमार कोंडे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, जिल्हा उपनिबंधक डॉ.किशोर मांडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांच्यासह अन्य विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.