ठाणे : ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपुरक गणेशमुर्ती विसर्जन संकल्पनेस ठाणेकरांनी यंदाही प्रतिसाद देऊन बुधवारी दीड दिवसांच्या १३ हजार ९५५ गणेश मुर्तींचे कृत्रिम तलावाबरोबरच विशेष टाकी व्यवस्थेत विसर्जन केले. त्यापैकी कृत्रिम तलावात ९६८ तर, विशेष टाकी व्यवस्थेत १ हजार ७७ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. शहरातील गृहसंकुले, नागरीवस्ती अशा विविध ४२ ठिकाणी पालिकेने यंदा प्रथमच विशेष टाकी विसर्जन व्यवस्था निर्माण केली असून घराजवळच ही व्यवस्था असल्याने त्यास ठाणेकरांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराची ही ओळख टिकविण्यासाठी पालिकेकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्याबरोबरच तलावातील पाणी प्रदुषित होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. या पर्यावरणपुरक गणेश मुर्ती विसर्जनास ठाणेकरांकडूनही दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतो. यंदाही हेच चित्र कायम असल्याचे दीड दिवसांच्या गणेश मुर्ती विसर्जनादरम्यान दिसून आले आहे. शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने व्यवस्था केली आहे.

हेही वाचा : पावसाच्या धारात घामाच्याही धारा! ऊन पावसाचा लपंडाव, गणेशभक्तांची तारांबळ

या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव या ठिकाणी एकूण १५ कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख या सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, शहरातील गृहसंकुले, नागरीवस्ती अशा विविध ४२ ठिकाणी पालिकेने यंदा प्रथमच विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था निर्माण केली आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये ओळखीच्या इसमाकडून व्यावसायिकाची फसवणूक

शहरात बुधवारी दीड दिवसांच्या १३ हजार ९५५ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी विसर्जन घाटावर ११ हजार ९१०, कृत्रिम तलावात ९६८ तर, विशेष टाकी व्यवस्थेत १ हजार ७७ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. यात कृत्रिम तलावांपेक्षा विशेष टाकी व्यवस्थेस ठाणेकरांनी अधिक प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहेत. घराजवळच ही व्यवस्था असल्याने त्यास ठाणेकरांनी पसंती दिल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २०२ गणेश मूर्तींचे तसेच ११ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेही घरच्या घरी विसर्जन शक्य, अंबरनाथ पालिकेच्या मदतीने रोटरी क्लबचा नवा प्रयोग

१० टनाहून अधिक निर्माल्य झाले जमा

ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. त्यात रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुर्ननिर्माणचे सदस्य मदत करतात. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १० टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. गेल्यावर्षी सात टन निर्माल्य संकलित झाले होते. यंदा त्यात तीन टन निर्माल्याची वाढ झाली आहे. करोनानंतर गणेशोत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढू लागल्याने ही वाढ झाल्याचे सुत्रांनी दिली. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यातील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. यंदा प्लास्टीक, थर्मोकोल या अविघटनशिल घटकांचे निर्माल्यातील प्रमाण लक्षणियरित्या कमी झाले आहे. आतापर्यंत केवळ ४ टक्के म्हणजे ४०० किलो अजैविक कचरा गोळा झाला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत कामगाराच्या मृत्युप्रकरणी विद्युत, रंगारी ठेकेदारांवर गुन्हे

विर्सजनाची आकडेवारी

(विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तींची संख्या)

विसर्जन घाट (७) – ११९१०

कृत्रिम तलाव (१५) – ९६८

विशेष टाकी व्यवस्था (४२) – १०७७

एकूण – १३९५५

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane ganesh visarjan of 13955 ganesh idols devotees prefer artificial lakes and special tanks ganeshotsav 2023 css