ठाणे – गतीमंद मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार तर, सावत्र बहिणीच्या नवऱ्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गतीमंद मुलीच्या सख्ख्या भावाने या दोघांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत डीएनसी शाळा भागात नवरात्रोत्सव मंडळांकडून डेरेदार झाडांवर विद्युत रोषणाई
पीडित २६ वर्षीय तरुणी ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास आहे. ती जन्मत: गतीमंद असून तीला व्यवस्थित बोलता येत नाही. एका पायाने ती अपंग आहे. तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईचा हा तिसरा विवाह होता. ती तिच्या आईसोबत राहत होती. याच घरात तिच्या दुसऱ्या सावत्र वडिलांची मुलगी आणि तिचा पती देखील राहत होते. गेले वर्षेभर तिच्यावर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार केला जात होता. तर, सावत्र बहिणीच्या नवऱ्याकडून मारहाण केली जात होती. पीडितेच्या आईचा २४ सप्टेंबर रोजी गंभीर आजाराने मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर पीडितेच्या सख्खा मोठा भाऊ पीडितेला घेऊन स्वत:च्या घरी गेला. पीडितेची तब्येत बिघडली होती. तिच्या कपाळावर तसेच शरिरावर मारहाणीच्या खुणा असल्याचे दिसून आले. त्यावेळी भावाने तिला शरिरावरील झालेल्या जखमांबाबत विचारले असता, तिने हातवारे करत तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी तिच्या भावाने तिची वैद्यकीय तपासणी केली असता, यातून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार आणि मारहाण झाल्याचे समोर आले.