ठाणे : नौपाडा येथील राम मारूती रोड परिसरातील सराफाचे एक कोटी ३० लाख १४ हजार ७२० रुपयांचे दागिने दुकानातील कर्मचाऱ्याने चोरी केले होते. नौपाडा पोलिसांनी शंभरहून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून माऊंट अबू येथील जंगलामधून कर्मचाऱ्याला अटक केली.
विशालसिंह राजपूत (२९) असे आरोपीचे नाव आहे. चोरी केलेल्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून तीन ते चार महिने परराज्यात फिरायचे आणि अहमदाबादमध्ये घर खरेदी करायचे, असा त्याचा मनसुबा होता, परंतु पोलिसांनी त्याआधीच त्याला अटक केली. माऊंट अबूच्या जंगलात दिवसा फिरणे आणि रात्री बसगाड्यांमध्ये प्रवास करून बसगाड्यांमध्ये झोपणे असा त्याचा दिनक्रम होता.
राम मारूती रोड परिसरात विरासत ज्वेलर्स आणि सिद्धार्थ ज्वेर्लस नावाची सराफाची दुकाने आहेत. विरासत ज्वेर्लस या दुकानात विशालसिंह राजपूत हा काम करत होता. दुकान मालकाने त्याला सिद्धार्थ ज्वेर्लसमधील दागिने आणण्यास सांगितले होते. परंतु विशालसिंह याने एक कोटी ३० लाख १४ हजार ७२० रुपयांचे दागिने चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी विरासत दुकानाच्या सराफा व्यापाऱ्याने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाकडून सुरु होता. पोलिसांनी चोरट्याविषयी अधिक माहिती घेतली असता, त्याने मुंबईतही अशाचप्रकारे चोरी केल्याचे समोर आले होते. याप्रकरणात एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याचा मूळ गावाचा पत्ता मिळू नये यासाठी त्याने दुकानातील आधारकार्ड व इतर कागदपत्रेही सोबत नेली होती.
हेही वाचा – डोंबिवलीतील कुटुंबाला युरोपचे पर्यटन महागात पडले
त्याचा मोबाईल क्रमांक सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावाने नोंद होता. त्यामुळे त्याच्या राहण्याचा पत्ता पोलिसांना प्राप्त होत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ठाणे तसेच इतर शहरांतील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. त्यावेळी तो वसई येथे जात असल्याचे आढळून आले. तिथून पुढे तो अहमदाबाद येथे जाणार होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने आठ ते १० वेळा रिक्षा बदलत प्रवास केला. तसेच मोबाईल क्रमांकाद्वारे त्याचा शोध लागू नये यासाठी त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये मोबाईल फेकून दिला होता. त्यानंतर त्याने वसई येथून पुढे अहदमबाद येथे जाण्यासाठी एका बसगाडीने प्रवास सुरू केला. तो राजस्थान येथील माऊंट आबू पर्वत भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक माऊंट अबूच्या दिशेने रवाना झाले. तेथील सार्वजनिक ठिकाणे, हाॅटेल, वाहनतळ, बसथांबे, धर्मशाळा याठिकाणी रेकी केली. परंतु तो कुठेही आढळून आला नाही.
आरोपी हा माऊंट अबू पर्वत येथील जंगलामध्ये दिवसा राहतो आणि रात्रीच्या वेळेत झोप काढण्यासाठी मिळेल त्या बसगाड्यांनी प्रवास करतो अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी वेशांतर करून जंगलामध्ये फिरण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो पोलिसांना आढळून आला. पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून १ कोटी २६ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.