ठाणे- श्री. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने आयोजित नव वर्ष स्वागत यात्रेत यंदा पहिल्यांदा ठाणे जिल्हा परिषदेचा सहभाग दिसून आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने या स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती सादर करणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता. नागरिकांनी या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांना विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यंदा स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष असल्यामुळे ‘संस्कृतीचा महाकुंभ’ यंदाच्या यात्रेत पाहायला मिळाला. विविध संस्था, महाविद्यालये, शाळा, ठाणे महापालिका त्यासह यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचा सहभाग या यात्रेत होता. ५० टक्के अनुदानावर संकरीत गायींचे / म्हशीचे वाटप, अनु.जाति/अनु.जमाती/दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहार अंतर्गत (बाळंतविडा), कुपोषित मुलांना / गरोदर स्तनदा मातांना विशेष आहार, उच्च आणि तांत्रिक शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री आवाज योजना-ग्रामीण अशा विविध योजनाबद्दल सविस्तर माहिती जिल्हा परिषदेने साकारलेल्या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आली.

ही स्वागत यात्रा श्रीकौपिनेश्वर मंदिर – रंगो बापूजी गुप्ते चौक जांभळी नाका – दगडी शाळा – श्री गजानन महाराज चौक – तिन पेट्रोल पंप – हरिनिवास सर्कल – नौपाडा पोलिस स्टेशन – टेलिफोन एक्सचेंज चौक – गोखले रोड – स्वीट कॉर्नर – राम मारुती रोड – पू ना गाडगीळ ज्वेलर्स – तलावपाळी – उजवीकडे वळून पुन्हा कौपिनेश्वर मंदिर येथे आली. या सर्व मार्गांवर चित्ररथावरील योजनाचे सादरीकरण चलचित्रामार्फत करण्यात आले.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेत नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सहभाग महत्त्वाचा होता, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या चित्ररथास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.